बिहारमध्ये खासदाराच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात झाला आहे. पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्या ताफ्यातील कार अनियंत्रित होत रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून खासदार पप्पू यादव थोडक्यात बचावले आहेत.
कटिहारच्या सालमरी येथे आयोजित एका खासगी कार्यक्रमाला जात असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास कटिहारमध्ये हा अपघात झाला. बेलोरी-सोनैली-सालमारी मुख्य रस्त्यावर ताफ्यातील वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले आणि सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
रस्त्याच्या अवस्थेवर संताप
अपघाताची बातमी कळताच घटनास्थळी स्थानिकांची मोठी गर्दी झाली. या अपघातामुळे रस्त्याच्या दयनीय अवस्थेवर आणि बांधकामातील निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांनी सांगितले की, या रस्त्यावर यापूर्वीही अपघात झाले आहेत, पण असे असूनही संबंधित विभागांनी आवश्यक पावले उचलली नाहीत. खासदारांच्या समर्थकांनीही याला प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे.
रस्त्याच्या बांधकामात सहभागी असलेल्या कंत्राटदार आणि संबंधित इंजिनिअर्सवर कारवाई करण्याची मागणी समर्थकांनी केली आहे. अपघातानंतर पप्पू यादव यांचे कार्यकर्ते चिंतेत आले होते. स्वतः पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली आणि आपण सुरक्षित असल्याचे सांगितले.
Leave a Reply