सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

आज राज्यभर रिक्षा बंद; बाईक टॅक्सी धोरणाविरोधात चालकांचा संप

बाईक टॅक्सी बंदच्या मागणीसाठी आज राज्यभर रिक्षा बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये निदर्शने होणार असून वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

आज राज्यभर रिक्षा बंद; बाईक टॅक्सी धोरणाविरोधात चालकांचा संप

बाईक टॅक्सी कायमस्वरूपी बंद करावी आणि त्यासंबंधीचे धोरण रद्द करावे, या मागणीसाठी आज राज्यभरातील रिक्षा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिकसह अनेक शहरांत रिक्षाचालक बंद पाळणार आहेत. त्यामुळे आज राज्यातील प्रवासी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

## पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये निदर्शने

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालक थेट लोकप्रतिनिधींच्या कार्यालयावर धडक देणार आहेत. आज सकाळी ११ वाजता परिवहन राज्यमंत्री तथा पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ आणि पिंपरीचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोर रिक्षाचालक जोरदार निदर्शने करणार आहेत. या निदर्शनांच्या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांनी दिली आहे. या आंदोलनात रिक्षा पंचायतसह आझाद रिक्षा संघटना आणि छावा वाहन चालक कामगार संघही सहभागी होणार आहेत.

## जिल्हाधिकारी आणि परिवहन आयुक्तांना निवेदन

कोणतीही अधिकृत परवानगी नसताना रॅपिडोसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून शहरात बेकायदेशीरपणे दुचाकीवरून प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला आहे. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आज राज्यभरातील सर्वच रिक्षा संघटनांनी रिक्षा बंदची हाक दिली आहे. तसेच, संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी आणि परिवहन आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती संजय नाईक यांनी दिली आहे.

## रिक्षाचालकांचा विरोध नेमका कशाला?

रिक्षाचालकांना विमा, योग्यता प्रमाणपत्र, ठराविक भाडेदर आणि गणवेश अशा अनेक सरकारी नियमांचे पालन करावे लागते. मात्र, कोणतीही जबाबदारी नसलेल्या खाजगी दुचाकींमुळे रिक्षाचालकांच्या आधीच कमी झालेल्या उत्पन्नात वाटेकरी निर्माण होत आहेत, असे संघटनांचे म्हणणे आहे.

यापूर्वी २०२२ मध्ये रिक्षा पंचायतीने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर सरकारने नेमलेल्या माजी सनदी अधिकारी रमानाथ झा यांच्या अभ्यास समितीनेही महानगरांमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देऊ नये, केवळ दुर्गम भागातच परवानगी द्यावी, अशी स्पष्ट शिफारस केली होती. झा समितीने विरोध करूनही राज्य सरकार पुन्हा एकदा महानगरांमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देण्याच्या तयारीत असल्याने रिक्षाचालकांमध्ये तीव्र संताप आहे. हे धोरण पूर्णपणे रद्द करून बाईक टॅक्सी हद्दपार करावी, अशी आग्रही मागणी आजच्या आंदोलनातून केली जाणार आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance