दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही काळापासून जोरात सुरू आहे. शरद पवार गटाने या चर्चा फेटाळून लावल्या असल्या, तरी त्यांना अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. शरद पवार यांना एनडीएमध्ये घेण्यासाठी भाजप उत्सुक आहे आणि भाजपने यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विलिनीकरण होत नसेल, तर चौथा सहकारी म्हणूनही पवार गटाला महायुतीत घेण्यास भाजप तयार आहे. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आम्ही त्यांचे स्वागतच करू
भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली आहे. एनडीएमध्ये जेवढे जास्त सहकारी येतील तेवढे चांगलेच आहे. शरद पवार गट कोणत्याही परिस्थितीत एनडीएमध्ये आला, तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. त्यांच्याशी आमचे संबंध चांगले आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले, तर ही उत्तम गोष्ट असेल. पण सत्तेच्या भागिदारीची समस्या पाहता विलिनीकरण होत नसेल आणि पवार गट एनडीएचा आणखी एक सहकारी म्हणून येत असेल, तर आम्हाला काही अडचण नाही, असे या मंत्र्याने सांगितले. भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानेही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र आणि राज्यात अनेक पक्षांशी आमची युती आहे. आम्हाला आघाडी सरकार चालवण्यात काहीच अडचणी नाहीत. शरद पवार यांचा पक्ष चौथा सहकारी म्हणून आमच्यासोबत येत असेल, तर त्यांना महायुतीत घेण्यास काही अडचण येऊ नये. आता शरद पवार यांनीच यावर निर्णय घ्यायचा आहे, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.
विलिनीकरणाला अडचण कशाची?
दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी भाजपने विलिनीकरणाचे समर्थन केले नव्हते. मात्र आता भाजपची संमती असल्याशिवाय विलिनीकरण न होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी कसे एकत्र येतील, याचा विचार करण्याची भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने परवानगी दिल्याचे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. आता अंतिम निर्णय दोन्ही पक्षांनाच घ्यायचा आहे. पवार गटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिवाळीच्या आधी आणि दिवाळी दरम्यान राज्यातील भाजपच्या नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यावेळी शरद पवार पुणे आणि मुंबईत रुग्णालयात दाखल होते. मात्र, पवार गटाकडून सार्वजनिकरित्या विलिनीकरणाची चर्चा फेटाळली गेली आहे. असा कोणताच प्रस्ताव आला नसल्याचे पवार गटाने म्हटले आहे. पवार गटाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी तर आमच्याकडे कोणताच प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे मी त्यावर टिप्पणी करणार नाही. माझा भाऊ गेला. सर्व गेले. विषय संपला, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. दुसरीकडे, विलिनीकरणाला नेमकी अडचण कशाची, असा सवाल केला जात आहे. राष्ट्रवादीचे नाव, चिन्ह आणि सर्वाधिक आमदार सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत. त्यामुळेच शरद पवार गटानेच अजितदादा गटात विलय व्हावे, असे अजितदादा गटाला वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. नेतृत्व कोण करणार, शरद पवार गट सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य करणार का, पार्थ पवार दुय्यम भूमिका घेतील का आणि विलिनीकरणानंतर सुप्रिया सुळे यांचे पक्षातील स्थान काय राहील, असे प्रश्नही दोन्ही राष्ट्रवादीसमोर आहेत. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार की नाही, हे सर्वस्वी शरद पवार यांच्यावर अवलंबून आहे.
Leave a Reply