आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या कामाच्या पद्धतीमुळे आयटी कंपन्या, कॉल सेंटर, रुग्णालये, कारखाने आणि सुरक्षा सेवांमध्ये लाखो कर्मचारी नाईट शिफ्टमध्ये काम करतात. सुरुवातीला रात्रभर जागणे सामान्य वाटत असले तरी, दीर्घकाळ नियमितपणे रात्री काम केल्याने केवळ झोप आणि थकव्यावरच नाही, तर थेट हृदयाच्या रचनेवर आणि कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा धक्कादायक खुलासा एका नव्या वैज्ञानिक संशोधनातून झाला आहे.
संशोधनात काय आढळले?
‘युरोपियन हार्ट जर्नल – कार्डिओव्हॅस्क्युलर इमेजिंग’ मध्ये १९ नोव्हेंबर रोजी हा महत्त्वपूर्ण अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनात ‘युके बायोबँक’शी संबंधित सुमारे ५२ वर्षे सरासरी वय असलेल्या ४२,६७१ लोकांच्या आरोग्याचा डेटा तपासण्यात आला. यामध्ये १,३२२ लोक नियमितपणे नाईट शिफ्ट करणारे होते.
संशोधकांनी हार्ट एमआरआय आणि रक्त नमुन्यांच्या मदतीने नाईट शिफ्ट करणाऱ्यांच्या हृदयाची सखोल तपासणी केली. नियमित नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांच्या हृदयाच्या मुख्य पंपिंग चेंबरच्या भिंती इतरांच्या तुलनेत थोड्या जाड झाल्याचे आढळले. तसेच काही चेंबरचा आकारही तुलनेने लहान दिसून आला. मात्र, हृदयाच्या पंपिंग क्षमतेत म्हणजेच इजेक्शन फ्रॅक्शनमध्ये कोणताही मोठा फरक आढळला नाही. त्यामुळे सर्वांचेच हृदय कमकुवत होत असल्याचा निष्कर्ष काढता येत नाही.
नाईट शिफ्ट करणाऱ्यांच्या रक्तात हृदयासाठी उपयुक्त असलेल्या डीएचए (ओमेगा ३ फॅटी अॅसिड) चे प्रमाण कमी आढळले. याशिवाय चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) कमी होणे आणि ट्रायग्लिसराइड्स तसेच शरीरातील सूज वाढण्याचे संकेतही दिसून आले.
रात्रीच्या कामामुळे शरीराचे ‘बॉडी क्लॉक’ का बिघडते?
आपल्या शरीरात एक नैसर्गिक जैविक घड्याळ असते, ज्याला ‘सर्केडियन रिदम’ म्हणतात. हेच घड्याळ शरीराला कधी झोपायचे आणि कधी जागे राहायचे याचे संकेत देते. जेव्हा एखादी व्यक्ती सतत रात्री जागते आणि दिवसा झोपते, तेव्हा नैसर्गिक बॉडी क्लॉक आणि दैनंदिन वेळापत्रक यातील ताळमेळ बिघडतो. याचा थेट परिणाम चयापचय क्रिया, रक्तदाब, हार्मोन्स आणि शरीरातील सूज प्रक्रियेवर होतो. त्यामुळे भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनी या गोष्टी नक्की पाळा
तज्ज्ञांच्या मते, नाईट शिफ्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. ड्युटी संपल्यानंतर शांत वातावरणात पुरेशी झोप घ्यावी आणि झोपण्याची वेळ शक्यतो नियमित ठेवावी. आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्य आणि ओमेगा ३ युक्त पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. दररोज चालणे आणि शारीरिक हालचालींसाठी वेळ काढावा; वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करू नये. नियमितपणे आपला रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी करून घ्यावी.
Leave a Reply