राज्यात नैसर्गिक प्रसूतीपेक्षा सिझेरियन शस्त्रक्रियेचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत राज्यात ६ लाख ४१ हजार ९२८ संस्थात्मक प्रसूती झाल्या. त्यापैकी ४८ टक्के म्हणजेच तब्बल ३ लाख ७ हजार १८८ प्रसूती सिझेरियनद्वारे झाल्या.
खासगी रुग्णालयांत सिझेरियन शस्त्रक्रियेचा आकडा ५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. खासगी रुग्णालयांत प्रत्येक दहा प्रसूतींमागे सुमारे सहा प्रसूती शस्त्रक्रियेने होत असल्याचे समोर आले आहे. नैसर्गिक प्रसूतीच्या तुलनेत शस्त्रक्रियेचे वाढते प्रमाण आरोग्य क्षेत्रासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
प्रत्येक शस्त्रक्रियेचे ऑडिट होणार
अनावश्यक शस्त्रक्रियांना आळा घालण्यासाठी राज्य कुटुंब कल्याण विभाग प्रत्येक सिझेरियन शस्त्रक्रियेचे ऑडिट करून त्यामागची कारणे शोधणार आहे. कोणत्या प्रसूतीत शस्त्रक्रिया खरोखर आवश्यक होती आणि कोणती टाळता आली असती, याचा अभ्यास या ऑडिटमधून केला जाणार आहे.
नऊ महिन्यांच्या या आकडेवारीने सिझेरियन प्रसूतींचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आरोग्य विभागाच्या या पावलामुळे अनावश्यक शस्त्रक्रियांवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply