राजस्थानच्या कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ धुळ्यातील भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. कोटामध्ये खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन धुळ्याकडे परतताना भाविकांच्या वाहनाची महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. प्राथमिक माहितीनुसार मृत्युमुखी पडलेले नऊ जण एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेने धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मंत्री महाजनांनी हलवली सूत्रे
दुर्घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रातून सूत्रे हलवली. त्यांनी राजस्थानमधील कोटा येथील जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. कोट्याचे जिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांनी मदतकार्याचा आढावा घेतला. जखमींना कोणताही विलंब न करता तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. गरज पडल्यास जखमींना अधिक चांगल्या आणि अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करण्याचेही त्यांनी सांगितले.
मदतकार्य आणि पार्थिवांची व्यवस्था
मंत्री महाजन यांनी राजस्थानमधील पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम, जखमींची प्रकृती, सुरू असलेले उपचार आणि मदतकार्याची सद्यस्थिती याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि त्यांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे पार्थिव लवकरात लवकर त्यांच्या मूळ गावी आणण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि वाहतूक व्यवस्था तातडीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे सांगण्यात आले. जखमींना तातडीने आणि दर्जेदार उपचार मिळणे तसेच मृतांच्या पार्थिवांना सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी भूमिका मंत्री महाजन यांनी व्यक्त केली. शासन या दुःखद प्रसंगी पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply