बुलढाणा येथे बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यावरून काँग्रेस नेते तथा लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. अमित देशमुख यांच्या आरोपात काही तथ्य नाही, त्यांनी असे बोलू नये, असे महाजन म्हणाले. मात्र, गरज पडली तर आताही लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशमुखांचा आरोप काय होता
लातूरला २०१६ मध्ये रेल्वेने पाणी आणण्याचा निर्णय हा राजकीय षडयंत्राचा भाग होता, असा आरोप अमित देशमुख यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच त्यावेळी हे राजकारण करण्यात आले, असे देशमुख म्हणाले होते. त्यावेळी दुष्काळाचा सामना करणारे बीड, नांदेड आणि धाराशिव हे जिल्हे असतानाही केवळ लातूरलाच रेल्वेने पाणी आणण्यासाठी निवड का करण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
महाजनांचे प्रत्युत्तर
अमित देशमुख यांनी रेल्वेने पाणीपुरवठ्यासंदर्भात इतक्या वर्षांनी बोलायचे, त्यावर टीका टिपणी करायची हे योग्य नाही, असे महाजन म्हणाले. त्यावेळी तिथल्या दुष्काळी परिस्थितीबाबत तिथल्या लोकांना विचारले पाहिजे. तिथे काय परिस्थिती होती, परिस्थितीनुसार त्यावेळी तो निर्णय घेण्यात आला होता. आताही त्या ठिकाणची परिस्थिती गंभीर आहे. वेळ आली तर पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात येऊ शकतो, असे म्हणत महाजन यांनी लातूरला रेल्वेने झालेल्या पाणीपुरवठ्याच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. तसेच, तिथल्या माणसांचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात गैर काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हा बँक निवडणुकीवरही भाष्य
जिल्हा बँक निवडणुकीमध्ये ९० टक्के मतदार आमचे आहेत, महायुतीत कुठेही वातावरण तापलेले नाही, असेही महाजन म्हणाले. चाळीसगावमध्येही आमदार मंगेश चव्हाण यांना ८५ पैकी ७५ मते पडतील. कुठेही लढत नसल्याने वातावरण तापलेले नाही.
आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर ज्या पद्धतीने नाव घेऊन आरोप केले आहेत, ते अतिशय चुकीचे आहे. खालच्या पातळीवर त्यांचे बोलणे योग्य नाही, याबाबत आपण किशोर पाटील यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचेही महाजन यांनी म्हटले. सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक दृष्ट्या बाद झाला होता. त्यांनी असे बोलण्याचे कोणीही समर्थन करणार नाही. मंगेश चव्हाण यांनी भाषणात काय बोलले हे आपल्याला माहिती नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कोणीही दडपण आणले नाही, आणि तसे ते करताही येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीच्या सर्वच २१ जागा निवडून येणार आहेत, असेही महाजन म्हणाले. मुक्ताईनगर आणि चाळीसगावमध्ये तिढा असला तरी निवडणूक होऊन लढत होऊ द्या, जे उभे आहेत त्यांनी जिल्हाभर फिरून मते मिळवावीत, असेही त्यांनी म्हटले.
Leave a Reply