चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी जमीन मोजणीवरून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आता चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. जमीन देण्यास बारा गावांतील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही प्रशासनाकडून मोजणी सुरू करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला
चेकबोरगाव आणि धानापूर परिसरात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घालत विरोध दर्शविला. धानापूर येथील शेतकरी बालू बोनगिरवार यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. यावेळी मुनगंटीवार यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस शिपायाशीही संवाद साधला.
शेतकऱ्यांचा विरोध असताना मोजणी कशाला करता? भाजपला संपवायला निघाले का? असा संतप्त सवाल त्यांनी पोलिसांना केला. मोबाईलवरील हा संवाद आता समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
२२ नोव्हेंबरला शेतकऱ्यांना भेटणार
शेतकऱ्यांचा विरोध असताना मोजणी होऊ देणार नाही, अशी ग्वाही देत मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. तसेच उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून आणि २२ नोव्हेंबरला संबंधित शेतकऱ्यांना चंद्रपुरात भेटून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे या जमीन मोजणीवरून आता राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे.
Leave a Reply