रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पहिल्या महिला फुल आयर्नमॅन! रेश्मा कुटे यांची कामगिरी

मीरा-भाईंदरच्या रेश्मा कुटे फुल आयर्नमॅन बनल्या; व्हिएतनाममध्ये त्यांनी ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी धावणे ही तीन आव्हाने वेळेत पूर्ण केली.

पहिल्या महिला फुल आयर्नमॅन! रेश्मा कुटे यांची कामगिरी

जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मीरा-भाईंदरच्या रेश्मा कुटे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक यश संपादन केलं आहे. व्हिएतनाम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फुल आयर्नमॅनचा किताब पटकावत त्यांनी मीरा-भाईंदर शहरासह पोलीस दलाचा नावलौकिक वाढवला आहे. मीरा-भाईंदर शहर आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पहिल्या महिला फुल आयर्नमॅन होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

तीन कठीण आव्हानं पूर्ण

फुल आयर्नमॅन ही अत्यंत कठीण आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत रेश्मा कुटे यांनी निर्धारित वेळेत ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावणे अशी तीन आव्हाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. विशेष म्हणजे, स्पर्धेपूर्वी विमान कंपन्यांच्या नियमांमध्ये अचानक बदल झाल्यामुळे सरावासाठी वापरण्यात येणारी त्यांची सायकल मुंबई विमानतळावरच रोखण्यात आली. मात्र या अडचणीसमोर हार न मानता त्यांनी व्हिएतनाममध्ये नवीन सायकल खरेदी केली. त्या सायकलमध्ये तांत्रिक अडचणी असूनही त्यांनी १८० किलोमीटरचं सायकलिंग यशस्वीपणे पूर्ण केलं.

दुखापतीवर मात करत इथपर्यंतचा प्रवास

रेश्मा यांचा हा यशस्वी प्रवास अनेक संघर्षांनी भरलेला आहे. २०११ मध्ये गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तब्बल सात वर्षे खेळापासून दूर राहावं लागलं. त्यानंतर २०१९ मध्ये शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांनी पुन्हा सराव सुरू केला. अवघ्या १० किलोमीटर चालण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज १६१ किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉनपासून फुल आयर्नमॅनसारख्या अत्यंत कठीण स्पर्धेपर्यंत पोहोचला आहे.

पोलीस दलातील जबाबदाऱ्या सांभाळत रेश्मा यांनी आतापर्यंत भारतासह परदेशात ७५ हून अधिक मॅरेथॉन आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठित कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये त्यांनी कांस्यपदक पटकावलं होतं. तसेच १६१ किलोमीटरच्या खुल्या महिला गटात पहिल्या पाच धावपटूंमध्ये त्यांनी स्थान मिळवलं होतं.

मूळच्या जुन्नर तालुक्यातील नेटवड गावच्या असलेल्या रेश्मा कुटे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संधीची वाट पाहण्यापेक्षा स्वतः संधी निर्माण करावी, तसेच सातत्यपूर्ण मेहनत, अनुभव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येतं, असा संदेश त्यांच्या कामगिरीतून मिळतो. पोलीस दलात कर्तव्य बजावत क्रीडा क्षेत्रात मिळवलेलं हे यश महिला सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण ठरलं असून, त्यांच्या या कामगिरीमुळे शहरासह पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance