मुंबईतील पुस्तकप्रेमी, विद्यार्थी आणि साहित्यिकांसाठी एक मोठी पर्वणी येत आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत यांच्या वतीने २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील प्रवेशद्वार क्रमांक २ जवळ हा सहा दिवसांचा महोत्सव रंगणार आहे. देशभरातील सुमारे २०० प्रकाशकांचे ६०० हून अधिक स्टॉल येथे असणार असून, नामवंत लेखक आणि साहित्यिकांची उपस्थिती हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या महोत्सवात नागरिकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. महोत्सवाची घोषणा आयोजनस्थळी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. त्यावेळी मुख्य आयोजक अमित साटम, मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक आणि मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे उपस्थित होते.
२०० प्रकाशकांचे ६०० हून अधिक स्टॉल
या महोत्सवात विविध भाषा आणि साहित्यप्रकारांतील पुस्तकांचा मोठा संग्रह वाचकांसाठी उपलब्ध असणार आहे. कथा, कादंबऱ्या, कविता, इतिहास, चरित्र, विज्ञान, शिक्षण, स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि बालसाहित्य अशा अनेक विषयांवरील पुस्तकांचा आनंद पुस्तकप्रेमींना घेता येणार आहे. सहा दिवसांत १०० हून अधिक कार्यक्रम आणि सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
नामवंत लेखक आणि मान्यवरांची उपस्थिती
साहित्य, कला, क्रीडा, चित्रपट, कायदा आणि अन्य क्षेत्रांतील अनेक नामवंत व्यक्ती या महोत्सवात सहभागी होणार आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंह संधू, आचार्य प्रशांत, पॅरालिम्पिक खेळाडू दीपा मलिक, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, गीतकार मनोज मुंतशिर, चित्रपट दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, अभिनेत्री व लेखिका शेफाली शाह आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा यात समावेश आहे. याशिवाय अरुणा ढेरे, विश्वास पाटील, शरणकुमार लिंबाळे, अश्विन सांघी, आनंद नीलकंठन, अक्षत गुप्ता, अंजुम चोप्रा, अंशुल चतुर्वेदी, निकिता ठाकूर आणि प्रफुल्ल बिल्लौरे यांच्यासह अनेक मान्यवर वक्ते उपस्थित राहणार आहेत.
‘वंदे मातरम्’ आणि सरदार पटेल यांच्यावर विशेष प्रदर्शने
या महोत्सवात केवळ पुस्तकांची विक्री आणि प्रदर्शन एवढेच मर्यादित स्वरूप नसणार आहे. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या १५० वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर विशेष प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्तही विशेष प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.
बालकांसाठी विशेष उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम
लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी महोत्सवात विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. दररोज सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत बालकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत लेखक मंचावर साहित्यिक संवाद, लेखकांशी थेट चर्चा आणि पुस्तक प्रकाशन सोहळे पार पडणार आहेत. सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. मुंबईतील वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, नव्या पिढीला पुस्तकांशी जोडणे आणि भारताच्या बहुभाषिक साहित्यिक परंपरेचा परिचय करून देणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
Leave a Reply