आयडीबीआय बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत डीव्हीसीए संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात डीव्हीसीएने क्रिकबेसिक्स संघाचा १७१ धावांनी पराभव केला. सहकारनगर येथील शाहू कॉलेज क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.
गादिया-पवारची दमदार भागीदारी
प्रथम फलंदाजी करताना डीव्हीसीए संघाने ४५ षटकांत ८ बाद ३०३ धावांचे आव्हान उभे केले. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने डीव्हीसीए संघ ४.३ षटकांत ३ बाद २७ धावा असा अडचणीत सापडला होता. त्यानंतर राज गादियाने १०४ चेंडूंत १० चौकार आणि ४ षटकारांसह १०३ धावांची संयमी खेळी केली. योगेश पवारने ७१ चेंडूंत १० चौकार आणि २ षटकारांसह ८२ धावा काढून त्याला साथ दिली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी १०३ चेंडूंत १३० धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर अवनीश कुलकर्णी नाबाद ३६ आणि संतोष राठोड २६ यांनी धावा काढून संघाला ३०३ धावांचा टप्पा गाठून दिला. क्रिकबेसिक्स संघाकडून श्रेयसने ३ बळी ३२ धावांत, वेणुगोपाल व्यासने ३ बळी ५६ धावांत आणि नैतिक जाधवने १ बळी २४ धावांत घेतले.
क्रिकबेसिक्सचा डाव १३२ धावांत संपुष्टात
या आव्हानाचा पाठलाग करताना क्रिकबेसिक्स संघाचा डाव २८.५ षटकांत सर्वबाद १३२ धावांत संपुष्टात आला. कृष्णा पालवे ३०, विश्वास कुकरेजा २५, श्रेयस १४ आणि वेणुगोपाल व्यास १२ यांनी थोडासा प्रतिकार केला. डीव्हीसीए संघाकडून संतोष राठोडने ३ बळी ११ धावांत, जय गोंदकरने २ बळी ११ धावांत, प्रज्योत गुंडाळेने २ बळी १५ धावांत आणि अथर्व काळेने २ बळी १९ धावांत घेतले. शतकी खेळी करणारा राज गादिया सामन्याचा मानकरी ठरला.
Leave a Reply