सध्या जगभरात बऱ्याच देशांत आणि खंडात युद्धे आणि छोटे-मोठे संघर्ष सुरू आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच त्यामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिकेची भर पडली. सौदी अरेबिया आणि येमेनमधील हूथी यांच्यातही संघर्ष सुरू झाला, तर इस्रायल गाझा पट्टीमध्ये अजूनही हल्ले चढवत आहे. अशा वेळी आफ्रिकेतील सुदानमधून आणखी एक खेदाची बातमी समोर आली आहे. सुदानमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांसह वृद्ध व्यक्तींना बसत आहे. संघर्षामुळे अनेक वृद्धांना आपली घरे सोडून विस्थापित व्हावे लागले आहे.
आयुष्याच्या उत्तरार्धात शांततेत जगण्याऐवजी त्यांना अन्न, औषधे आणि सुरक्षित निवाऱ्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. युद्धामुळे त्यांना मिळणारी महत्त्वाची आधारभूत मदतही बंद झाली असून, आरोग्यसेवा मिळवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.
खार्तूममधील वृद्धांना घर सोडावे लागले
सुदानमधील खार्तूमच्या बहरी परिसरात अनेक वर्षे राहिलेल्या वृद्धांनाही युद्धामुळे आपली घरे सोडावी लागली आहेत. घाईघाईने बाहेर पडताना त्यांना केवळ काही कपडे आणि मोजक्या वस्तू सोबत घेता आल्या. घरातील आठवणी, छायाचित्रे आणि आयुष्यभर जमवलेल्या वस्तू मागेच राहिल्या.
वयामुळे लांबचा प्रवास करणे कठीण असतानाही त्यांना सुरक्षित ठिकाण गाठावे लागत आहे. अनेक वृद्धांची मुले आणि नातेवाईक वेगवेगळ्या भागांत विस्थापित झाल्याने त्यांचा कौटुंबिक आधारही तुटला आहे. कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्या वृद्धांना आर्थिक अडचणींसह एकाकीपणा आणि असुरक्षिततेचाही सामना करावा लागत आहे.
औषधांचा तुटवडा, उपचारांचा खर्च
युद्धामुळे सुदानमधील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे. विशेषतः मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या आजारांनी ग्रस्त वृद्धांना नियमित उपचार मिळत नाहीत. औषधांचा तुटवडा आणि वाढलेल्या किमतींमुळे उपचार घेणे कठीण झाले आहे. काही वृद्धांना औषधांचे प्रमाण कमी करावे लागत आहे. रुग्णालयांपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीची समस्या, असुरक्षित वातावरण आणि उपचारांचा खर्च या अडचणीही वाढल्या आहेत. परिणामी अनेक वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
युद्धामुळे विस्थापितांसाठी राबवण्यात येणाऱ्या मदतकार्यावरही परिणाम झाला आहे. अन्नवाटप केंद्रांवरील लांब रांगा, हालचालींवरील मर्यादा आणि मदतीच्या अपुऱ्या सुविधांमुळे वृद्धांना आवश्यक वस्तू मिळवणे कठीण झाले आहे. अनेक वृद्धांना जेवणासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे.
कुटुंबातील सदस्यांपासून दूर झाल्याने मानसिक तणाव आणि एकाकीपणाही वाढत आहे. या परिस्थितीत वृद्धांसाठी स्वतंत्र आरोग्यसेवा, घरपोच औषधे, अन्नधान्य आणि मानसिक आधार उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.
Leave a Reply