घरात तांदूळ, डाळ आणि इतर धान्य साठवताना अनेकदा त्यामध्ये छोटे-छोटे किडे किंवा भुंगे आढळतात. धान्य हवाबंद डब्यात ठेवूनही काही वेळा ही समस्या उद्भवते. विशेषतः धान्यात ओलावा निर्माण झाल्यास किड्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे संपूर्ण धान्य खराब होण्याची शक्यता असते. अशा वेळी लगेच धान्य फेकून देण्याऐवजी काही घरगुती उपाय करता येतात.
तांदळाच्या डब्यात ठेवा तमालपत्र
तांदळामध्ये किडे होऊ नयेत यासाठी तमालपत्राचा वापर करता येतो. तांदळाच्या डब्यात चार ते सहा तमालपत्रे ठेवावीत. डब्याचे झाकण व्यवस्थित बंद ठेवल्यास किड्यांचा प्रादुर्भाव कमी ठेवण्यास मदत होऊ शकते.
लवंग ठरू शकते फायदेशीर
लवंगाचा तीव्र वास किड्यांना दूर ठेवण्यास मदत करू शकतो. यासाठी तांदूळ किंवा डाळीच्या डब्यात काही लवंगा ठेवाव्यात. मात्र लवंग थेट धान्यात मिसळण्याऐवजी छोट्या स्वच्छ पिशवीत ठेवणे अधिक सोयीचे ठरते.
फ्रिजमध्ये ठेवा धान्य
तांदळामध्ये छोटे किडे किंवा भुंगे दिसू लागल्यास तो काही काळ फ्रिजमध्ये ठेवण्याचा उपाय करता येतो. डाळही कमी प्रमाणात हवाबंद डब्यात किंवा झिप लॉक पिशवीत ठेवता येते.
लसणाच्या पाकळ्यांचा करा वापर
तांदळाच्या डब्यात सोलून न ठेवलेल्या लसणाच्या काही पाकळ्या ठेवल्याने किड्यांना दूर ठेवण्यास मदत होऊ शकते. लसूण सुकल्यानंतर तो बदलून नवीन पाकळ्या ठेवाव्यात. डाळीच्या डब्यातही चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेवण्याचा उपाय सांगितला जातो.
धान्य उन्हात वाळवा
तांदूळ किंवा डाळीमध्ये किडे दिसल्यास ते स्वच्छ कापडावर पसरवून उन्हात ठेवण्याचा उपाय करता येतो. तांदूळ एक दिवस, तर डाळ दोन ते तीन दिवस उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर धान्य स्वच्छ आणि पूर्णपणे कोरड्या हवाबंद डब्यात साठवावे.
कडुलिंब आणि लाल मिरच्यांचाही उपयोग
डाळीला किडे लागू नयेत यासाठी डब्यात कडुलिंबाची वाळलेली काडी ठेवण्याची पारंपरिक पद्धत आहे. यामुळे किड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होऊ शकते. डाळीच्या डब्यात दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या ठेवल्यानेही किड्यांना दूर ठेवण्यास मदत होऊ शकते. तसेच डब्यात आठ ते दहा लवंगा ठेवण्याचाही उपाय सांगितला जातो.
धान्य साठवताना ही काळजी घ्या
धान्य नेहमी स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यात साठवावे. ओल्या हातांनी डब्यातून धान्य काढणे टाळावे. डब्यांमध्ये ओलावा जाणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच धान्यात बुरशी, कुबट वास किंवा जाळी दिसल्यास ते खाणे टाळावे.
Leave a Reply