निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिज्म योग्य पद्धतीने कार्यरत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मेटाबॉलिज्म केवळ अन्न पचवण्याचे काम करत नाही, तर आपण खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासही मदत करते. शरीराला दैनंदिन कामांसाठी आवश्यक ऊर्जा मिळण्यासोबतच कॅलरी बर्न करण्याच्या प्रक्रियेतही मेटाबॉलिज्मची महत्त्वाची भूमिका असते.
मेटाबॉलिज्मची गती मंदावल्यास वजन वाढणे आणि शरीरात सुस्ती जाणवणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मेटाबॉलिज्म चांगले ठेवण्यासाठी योग्य आहारासोबत नियमित व्यायाम करणेही गरजेचे आहे. यासाठी योगासने हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. काही विशिष्ट योगासनांच्या नियमित सरावामुळे शरीराची सक्रियता टिकवून ठेवण्यास, लवचिकता वाढवण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. मेटाबॉलिज्म सुधारण्यासाठी कोणती दोन योगासने करावीत आणि त्यांचा सराव कसा करावा, जाणून घेऊया.
अंजनेयासन
अंजनेयासन हे भगवान हनुमानाच्या नावावरून ओळखले जाणारे योगासन आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे शरीराची लवचिकता वाढण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि चयापचय क्रिया सक्रिय ठेवण्यास मदत होऊ शकते. हे आसन करण्यासाठी सरळ उभे राहून पुढे वाका आणि दोन्ही हात जमिनीवर ठेवा. आता उजवा पाय पुढे गुडघ्यात वाकवा आणि डावा पाय मागे नेऊन गुडघा जमिनीवर टेकवा. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या वर उचलून जोडा आणि शरीराचा वरचा भाग हळूहळू मागे वाकवा. काही सेकंद या स्थितीत राहून पूर्वस्थितीत या. दुसऱ्या पायानेही याच पद्धतीने आसन करा.
उत्कटासन
उत्कटासनाला चेअर पोझ असेही म्हणतात. हे आसन केल्याने पाय, मांड्या, नितंब आणि पाठीच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. तसेच शरीराची ताकद आणि संतुलन सुधारण्यास मदत होते. हे आसन करण्यासाठी सरळ उभे राहून दोन्ही हात डोक्याच्या वर न्या. त्यानंतर खुर्चीवर बसल्याप्रमाणे गुडघे वाकवून कंबर खाली आणा. या स्थितीत शरीराचा तोल सांभाळत काही सेकंद राहा आणि नंतर पुन्हा सरळ उभे राहा. मात्र, पाठ किंवा गुडघ्यांना दुखापत असल्यास हे आसन करणे टाळावे.
Leave a Reply