शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रविवारी मुंबईत तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; वेळापत्रक तपासा

रविवारी मुंबईत तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. रुळांची दुरुस्ती, सिग्नलची कामे आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रविवारी मुंबईत तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; वेळापत्रक तपासा

मुंबईत रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील कामे करण्यात येणार आहेत. तसेच ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे तिन्ही मार्गांवरील लोकल रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी रविवारी घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक जाणून घ्यावे.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक कसे असेल?

मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी येथून सकाळी ९.३४ ते दुपारी २.१७ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद आणि अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गांवर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या पुढे ठाणे ते कल्याणदरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. परंतु या गाड्यांना रेल्वे स्थानकांवर पोहोचण्यासाठी १० मिनिटे उशिरा लागण्याची शक्यता आहे.

कल्याणमधून सकाळी १०.२८ ते दुपारी २.५८ या वेळेत सुटणाऱ्या अप फास्ट आणि सेमी फास्ट उपनगरीय रेल्वे या कल्याण आणि ठाणे स्टेशनदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या नियोजित रेल्वे स्टेशनवर थांबतील. पुढे मुलुंड रेल्वे स्टेशनवर या गाड्या पुन्हा अप फास्ट मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गाचे वेळापत्रक

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रेदरम्यान डाऊन हार्बर मार्गावर सकाळी १०.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी व वांद्रे ते सीएसएमटीदरम्यान अप हार्बर मार्गावर सकाळी १०.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक असणार आहे.

सीएसएमटीमधून सकाळी १०.१० ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी, बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर सेवा आणि सकाळी १०.०६ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे व गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर सेवा रद्द करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सकाळी ९.१२ ते दुपारी ३.२० या वेळेत सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अप हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहणार आहेत. तसेच गोरेगाव आणि वांद्रे येथून सकाळी ९.१३ ते सायंकाळी ५.१३ या वेळेत सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या अप हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहणार आहेत.

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा ठाणे ते वाशी आणि नेरुळ ते ठाणे स्थानकांदरम्यान वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. पोर्ट लाईन (उरण लाईन) सेवा नेरुळ आणि बेलापूर ते उरण ते नेरुळ आणि बेलापूर स्थानकांदरम्यान वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा असणार आहे.

पश्चिम मार्गावर कसे असेल वेळापत्रक?

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्टेशनदरम्यान रविवारी पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकसाठी ब्लॉक अप आणि डाऊन धीम्या (स्लो) मार्गांवर सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानच्या सर्व धीम्या मार्गावरील लोकल गाड्या फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय रेल्वे सेवा रद्द राहणार आहेत. तसेच चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल गाड्या वांद्रे किंवा दादर स्टेशनपर्यंत चालवण्यात येणार आहेत.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance