कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीचे वातावरण शांत झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. या संवादात दोन्ही नेत्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा शेतीत होणारा वापर याविषयी माहितीची देवाणघेवाण केली. या चर्चेची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केले होते. या निवडणुकीमुळे संपूर्ण राज्याचे राजकारण तापले होते. मात्र अखेरच्या क्षणी सरकारच्या निर्णयाने डाव फिरला आणि शासन नियुक्त संचालकांच्या मतांच्या जोरावर महायुतीला अध्यक्षपद मिळाले. निवडणुकीचे वातावरण निवळल्यानंतर शरद पवार यांचा मुश्रीफ यांच्याशी फोनवर संवाद झाला.
गोकुळ निवडणुकीनंतरचा संवाद
दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या संवादाची संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सध्या हसन मुश्रीफ यांच्या एआय शेतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही फोनद्वारे मुश्रीफ यांच्या एआय शेतीचे कौतुक केले. एआय शेतीद्वारे वाढलेल्या ऊस उत्पादनाची माहिती शरद पवार यांनी फोनवरून घेतली. ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या जागृतीबाबत दोघांमध्ये चर्चा झाली.
एआयमुळे ऊस उत्पादनात मोठी वाढ
मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवले आहे. एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्यांच्या शेतातील ऊस उत्पादन एकरी ४० टनांवरून थेट ९० टनांवर पोहोचले आहे. कागल तालुक्यातील करनूर येथील फोंड्या माळरानावरील त्यांच्या शेतीमध्ये एकरी ९० टन ऊस उत्पादन मिळाले आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या वतीने दोन हजार एकरांमध्ये एआयचा वापर करण्याचा मुश्रीफ यांचा निर्धार आहे. सध्या अडीचशे एकरांवर हा प्रकल्प सुरू आहे. यापूर्वी अनेक प्रयत्नानंतरही एकरी ४० टन उत्पादन मिळत होते. एआयच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादन जवळपास दुपटीने वाढून ते ९० टनांपर्यंत गेले आहे. ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अपरिहार्य आणि काळाची गरज बनत चालला आहे.
Leave a Reply