धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून २२७ कोटी रुपये देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपन्यांना दिले आहेत. या रकमेचा लाभ जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना होणार असून, पुढील पंधरा दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
७२ तासांच्या अटीवरून विमा नाकारला होता
२०२० मध्ये अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी पीक विम्याची मागणी केली होती. मात्र, शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पोर्टलवर नोंद केली नव्हती, असे कारण देत विमा कंपन्यांनी रक्कम देण्यास नकार दिला होता. या निर्णयाविरोधात २०२१ मध्ये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देत शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. विमा कंपन्यांनी भेदभाव केल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.
प्रति हेक्टर आणखी सात हजार रुपये मिळणार
या निकालानंतर आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आणखी सात हजार रुपये मिळणार आहेत. यापूर्वी प्रति हेक्टर अठरा हजार रुपये देण्याचे ठरले होते, मात्र साडेतीन लाख शेतकऱ्यांना दहा ते अकरा हजार रुपयेच मिळाले होते. उर्वरित रक्कम आता मिळणार आहे. दुष्काळाच्या काळात ही मोठी रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आनंद
या निकालावर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी २०२१ मध्ये ही याचिका दाखल केली होती आणि आजच्या निकालाला त्यांनी ऐतिहासिक म्हटले आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही या निकालाचे स्वागत केले असून, कार्तिक एकादशीच्या मुहूर्तावर न्याय मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अधिकाऱ्यांनी मोठी मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply