अमेरिकेत राहणाऱ्या एका मराठी महिलेने तिथल्या ग्रामीण जीवनावर बनवलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. या व्हिडीओत तिने अमेरिकेतील गावांमध्ये राहणारी माणसं शेतीतून पैसे कसे कमावतात, याची झलक दाखवली आहे. दोन्ही देशांतील शेतकऱ्यांचं काम वरवर पाहता सारखंच दिसतं, तरीही त्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठा फरक का दिसतो, हा प्रश्न या व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.
भारताप्रमाणेच अमेरिकेतील ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्याशिवाय पशुपालन करणं, दुसऱ्याच्या शेतात काम करणं, दूध, चीज आणि बटर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणं, अशी कामंही तिथे केली जातात. काही शेतकरी शेतीची यंत्रं भाड्याने देणं, धान्य साठवणं, त्यावर प्रक्रिया करणं आणि पॅकिंग करणं, असे शेतीला पूरक व्यवसायही चालवतात.
शेतीसोबत जोडधंदेही सारखेच
विशेष म्हणजे, असे जोडधंदे भारतातील शेतकरीही करतात. दोन्हीकडची कामं जवळपास सारखीच असताना अमेरिकेतील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम का दिसतात, याचं उत्तर तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या व्यवस्थेत दडलं आहे. अमेरिकेतील शेतीत अद्ययावत तंत्रज्ञान आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम कमी होतात आणि कामं अधिक वेगाने पूर्ण होतात.
मग फरक नेमका कुठे पडतो?
यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना, सुपरमार्केटमध्ये किंवा स्थानिक बाजारपेठेत विकता येतो. त्यामुळे मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होतं आणि विक्रीतून मिळणारा नफा शेतकऱ्याच्या हाती अधिक राहतो. शेतमालावर प्रक्रिया करून त्याचं पॅकिंग आणि ब्रँडिंग केल्यास उत्पन्नात आणखी वाढ होते. तिथली विकसित वितरण व्यवस्था आणि बाजारपेठेची उपलब्धता यामुळे उत्पादनाला चांगला दर मिळण्याची संधी वाढते.
त्यामुळेच शेती आणि जोडधंद्यांचं स्वरूप साधारण सारखं असूनही अमेरिकेतील काही ग्रामीण कुटुंबं आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध दिसतात. शेतीवर अवलंबून असलेली ही कुटुंबं भारतातील अनेक उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांपेक्षाही संपन्न जीवन जगताना दिसतात, असं या व्हिडीओतून समोर येतं.
हा व्हिडीओ आतापर्यंत पाच लाख ७८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना अमेरिकन शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना असतात का, असा प्रश्न पडला आहे, तर काहींनी भारतातही अॅग्रो टुरिझमला अधिक प्रोत्साहन मिळायला हवं, असं मत व्यक्त केलं आहे. शेतीसोबत विविध जोडधंदे करून आपल्या देशातही चांगला व्यवसाय उभा करता येऊ शकतो, ही भावना अनेक प्रतिक्रियांमधून व्यक्त झाली आहे.
Leave a Reply