तरुणाईमध्ये बॉडीबिल्डिंगची क्रेझ वाढत असून, सोशल मीडियावरील जाहिरातींमुळे हेल्थ सप्लिमेंट्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, वैद्यकीय सल्ल्याविना हे पदार्थ घेतल्याने तरुणांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत हेल्थ सप्लिमेंट्स, न्यूट्रास्युटिकल्स आणि विशेष आहाराबाबत कडक नियमावली लागू केल्याची घोषणा केली आहे.
प्रोटीन पावडर, मल्टी-व्हिटॅमिन गोळ्या, वजन घटवणाऱ्या गोळ्या, क्रीडा पूरक आहार आणि हर्बल उत्पादनांची बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. मात्र, १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईत अनेक गंभीर प्रकार निदर्शनास आले. काही उत्पादनांमध्ये मूळ पदार्थ वेगळाच असून, विक्री मात्र वेगळ्याच नावाने केली जात असल्याचे उघड झाले.
जिम, केमिस्ट आणि इन्फ्लुएंसर्सना नियम लागू
ही नियमावली उत्पादक, पुरवठादार, वितरक, आयातदार, औषधालये, जिम आणि हेल्थ सेंटर्स या सर्वांना बंधनकारक असणार आहे. या सर्वांकडे अन्न व औषध प्रशासनाचा परवाना असणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर्सकडून प्रोटीन पावडर, वजन घटवणे किंवा चेहऱ्यावर ग्लो येतो, असे खोटे दावे करून जाहिराती केल्या जात आहेत. लहान बालके, गर्भवती माता, रुग्ण आणि खेळाडू कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याविना हे पदार्थ ‘औषध’ समजून सेवन करत आहेत. अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही आता कडक कारवाई होणार आहे. हेल्थ सप्लिमेंट्स हे केवळ दैनंदिन आहाराला पूरक असतात; त्यातून कोणताही आजार बरा होत नाही. प्री-बायोटिक, प्रो-बायोटिक किंवा इतर घटकांच्या वापरासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
नियम मोडल्यास दंड आणि जन्मठेप
नियमावलीचे उल्लंघन केल्यास पाच लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. दिशाभूल करणारी जाहिरात केल्यास दहा लाख रुपयांपर्यंत दंड, तर परवान्याविना व्यवसाय केल्यासही दहा लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. सप्लिमेंट्सच्या सेवनाने एखाद्याचा मृत्यू झाल्यास थेट जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. सर्वसामान्य नागरिकांनी आणि तरुणांनी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. कुठेही नियमबाह्य कृत्य किंवा बनावट सप्लिमेंट्सची विक्री आढळल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply