मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या तिच्या ‘मैत्रेया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, या चित्रपटाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वीच तिच्या कुटुंबावर मोठं संकट ओढावलं होतं. चित्रपटाचं काम सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी क्रांतीच्या आईला कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यामुळे गेल्या काही काळापासून क्रांती आईसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नव्हती. आता तिच्या आईने कर्करोगावर मात केली असून, ही आनंदाची बातमी अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यासोबतच आईचं एक स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंतही तिने व्यक्त केली आहे.
‘मैत्रेया’ चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्याला जाण्यापूर्वी क्रांतीने आईसोबतचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओला तिने ‘माझ्याकडे आई आहे, माझी सुखाची व्याख्या’ असं कॅप्शन दिलं होतं. या व्हिडिओमध्ये तिने आईच्या आजारपणाबद्दल खुलासा केला. क्रांती म्हणाली की, ‘मैत्रेया’साठी काम सुरू केल्याच्या एक दिवस आधी आईला कर्करोगाचं निदान झालं होतं आणि त्यावेळी आई कर्करोगाशी झुंज देत होती. आई आता कर्करोगमुक्त असल्याचा आनंद तिने व्यक्त केला.
प्रीमियरचं स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत
आईने कर्करोगावर मात केल्यानंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. मात्र, त्यानंतर आणखी एक संकट आलं. ‘मैत्रेया’च्या म्युझिक प्रीमियरला उपस्थित राहण्यासाठी क्रांतीची आई आली होती. पण तिथे त्यांचा अपघात झाला आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं. त्यानंतर त्यांच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे चित्रपटाच्या मुख्य प्रीमियर सोहळ्याला आईला उपस्थित राहता येणार नसल्याची खंत क्रांतीने व्यक्त केली.
यावर क्रांतीच्या आईनेही अतिशय भावूक प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, अपूर्ण काहीच राहिलेलं नाही; मनातून त्या चित्रपट बघणार आहेत आणि आशीर्वादही देणार आहेत. त्या इन्स्टाग्राम नेहमी पाहत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आईच्या या शब्दांनी हा व्हिडिओ अधिकच भावुक झाला आहे.
२० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत ‘मैत्रेया’
क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिच्या आई-वडिलांनी चित्रपटासाठी तिने घेतलेल्या मेहनतीचं भरभरून कौतुक केलं आहे. अभिनेत्रीचे वडीलही ‘मैत्रेया’ हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आई-वडिलांचा पाठिंबा आणि आशीर्वाद तिच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, याची झलक या व्हिडिओतून दिसते.
समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’ हा चित्रपट २० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर हे चित्रपटाचे निर्माते असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत. चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आईच्या आजारपणापासून ते तिच्या कर्करोगमुक्त होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर अपघातामुळे प्रीमियरला उपस्थित राहता न येणं, अशा अनेक भावनिक प्रसंगांना क्रांतीला सामोरं जावं लागलं.
Leave a Reply