मराठी रंगभूमीला अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबईतील नेहरू सेंटरने विशेष उपक्रम सुरू केला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुढाकाराने आता दर रविवारी दुपारी ३.३० वाजता नेहरू सेंटरमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत. व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांना येथे सादरीकरणाची संधी मिळणार आहे. मराठी नाट्यनिर्मात्यांना रविवारच्या प्रयोगांसाठी नेहरू सेंटरचं नाट्यगृह सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
या उपक्रमामुळे मराठी रंगभूमीला मुंबईतील एका प्रतिष्ठित सांस्कृतिक केंद्रात आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. मराठी नाटकांचा प्रेक्षकवर्ग वाढवणं आणि नव्या प्रेक्षकांना मराठी रंगभूमीकडे आकर्षित करणं, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नेहरू सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन करीर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दर रविवारी दुपारी ३.३० वाजता नाट्यप्रयोग
नेहरू सेंटरमध्ये आजवर मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांमधील सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रयोग सादर झाले आहेत. हिंदी आणि गुजराती नाटकांचे प्रयोगही येथे नियमितपणे आयोजित केले जातात. मात्र, मराठी नाटकांनाही या प्रतिष्ठित व्यासपीठावर अधिकाधिक संधी मिळावी, अशी नेहरू सेंटर व्यवस्थापनाची इच्छा होती. त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला पुढाकार घेण्याची विनंती करण्यात आली.
नेहरू सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन करीर यांनी सांगितलं की, नेहरू सेंटर हे केवळ नाट्यप्रयोगांसाठी उपलब्ध असलेलं ठिकाण न राहता एक महत्त्वाचं सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित व्हावं, असा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. देशभरात उत्तम काम करणाऱ्या नाट्यसंस्था, कलाकार आणि नाट्यनिर्मात्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका आहे. मराठी रंगभूमीवरील दर्जेदार व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना येथे सादरीकरणाची संधी मिळावी, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाची सुरुवात दर रविवारी दुपारी ३.३० वाजता मराठी नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यापासून होणार आहे. सुरुवातीला रविवारच्या प्रयोगांवर भर दिला जाणार आहे. या प्रयोगांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन भविष्यात आठवड्यातील इतर दिवशीही मराठी नाटकांचे प्रयोग आयोजित करण्याचा विचार आहे.
कोणती नाटके सादर होणार?
या उपक्रमांतर्गत ‘ही दोस्ती तुटायची नाही’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे. आगामी काळात ‘पुढच्या शुक्रवारी सात वाजता’, ‘भूमिका’, ‘जर तरची गोष्ट’, ‘काटकोन त्रिकोण’, ‘आमने सामने’ आणि ‘मराठी बाणा’ यांसारखी नाटके नेहरू सेंटरमध्ये सादर होणार आहेत.
मराठी नाट्यनिर्मात्यांसाठी रविवार हा महत्त्वाचा दिवस असतो. मात्र, या दिवशी नाट्यगृह उपलब्ध होणं अनेकदा कठीण जातं. ही अडचण लक्षात घेऊन नेहरू सेंटर व्यवस्थापनाने मराठी नाट्यनिर्मात्यांना सवलतीच्या दरात नाट्यगृह उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात केवळ लोकप्रिय व्यावसायिक नाटकांनाच नव्हे, तर आशयघन आणि वेगळे प्रयोग करणाऱ्या प्रायोगिक नाटकांनाही प्रोत्साहन दिलं जाणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं. कलाकार आणि नाट्यनिर्माते म्हणून नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी चांगलं व्यासपीठ मिळणं किती महत्त्वाचं असतं, याची आपल्याला जाणीव असल्याचं त्यांनी सांगितलं. नेहरू सेंटरसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी मराठी नाटकांना संधी मिळणं ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मराठी नाटकांच्या प्रयोगांना मराठी प्रेक्षकांसोबतच अमराठी प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळे मराठी रंगभूमीने या संधीचं स्वागत करून दर्जेदार नाट्यप्रयोग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत, असं मत अजित भुरे यांनी व्यक्त केलं.
या उपक्रमाचं स्वरूप केवळ नाट्यप्रयोगांपुरतं मर्यादित राहणार नाही. ‘आविष्कार’ संस्थेच्या सहकार्याने नाट्यवाचन, कार्यशाळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याचं नियोजन आहे. तसेच इतर भारतीय भाषांमधील नाटकांनाही या व्यासपीठावर संधी देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नाट्यगृह उपलब्ध करून देण्यापलीकडे जाऊन नाट्यनिर्मिती, नाट्यसंस्था आणि कलाकारांना आवश्यक सहकार्य करण्याची नेहरू सेंटर व्यवस्थापनाची तयारी आहे. एनसीपीएच्या धर्तीवर नाट्यनिर्मिती क्षेत्रातही पुढाकार घेण्याचा विचार आहे. यासाठी विविध नाट्यप्रयोग, महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
Leave a Reply