पुणे जिल्ह्यातील ८६ तलाव आणि २० हजार १७८ हेक्टर जलक्षेत्राच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायाच्या विस्ताराला मोठी संधी असतानाच, मत्स्यपालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजना आणि मासेमारी परवाना सेवा आता ऑनलाइन होणार असल्याने अनुदान मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. जागतिक मत्स्य व्यवसाय दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी चालना देणारा ठरण्याची अपेक्षा आहे.
महाडीबीटी २.० पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज
मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास, मत्स्य व्यावसायिकांचे उत्पन्न वाढविणे आणि रोजगारासह उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजना आणि मासेमारी परवाना सेवा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात येणार आहेत. पुणे विभागातील मत्स्यपालक, मच्छीमार आणि संबंधित व्यावसायिकांनी महाडीबीटी २.० पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पुणे मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त अर्चना शिंदे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाडीबीटी २.० पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. या नव्या प्रणालीमुळे अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे ऑफलाइन सादर करण्याची गरज राहणार नाही. शासकीय माहितीच्या आधारे अर्जांची स्वयंचलित पडताळणी केली जाणार असून, मंजूर अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. पुणे जिल्ह्यात यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज करताना अडचणी आल्यास या कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाची सद्यस्थिती
जिल्ह्यात मत्स्यव्यवसायासाठी एकूण ८६ तलाव असून, त्यांचे जलक्षेत्र २० हजार १७८.५ हेक्टर आहे. या जलक्षेत्रात २१२.८५ लाख मत्स्यबोटुकली संचयनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यातून ५ हजार ९६८.५२५ टन मत्स्योत्पादन अपेक्षित आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत उजनी जलाशयासह जिल्ह्यातील मत्स्योत्पादन ८ हजार १६ टन नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्यातील तलावांचे व्यवस्थापन कार्यक्षेत्रानुसार, जाहीर लिलाव आणि ई-निविदा अशा तीन पद्धतींनी केले जाते.
मत्स्यबीज उत्पादनासाठी हडपसर, बारामती, भिगवण आणि वीर येथे केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमधून मत्स्यजीरे आणि मत्स्यबोटुकलीचे उत्पादन केले जाते. जिल्ह्यात ५६ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था असून, त्यांचे एकूण २ हजार ८७० सभासद आहेत. याशिवाय सात मत्स्यशेतकरी उत्पादक संस्था आणि कंपन्यांची नोंदणी झाली आहे. नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्मवर ५ हजार ७५४ मच्छीमार आणि संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच अपघात गट विमा योजनेअंतर्गत ४ हजार ३३ मच्छीमारांची माहिती सादर करण्यात आली आहे.
Leave a Reply