शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

हापूसच्या जीआय मानांकनावरून वाद, कोकणातील उत्पादक संतप्त

वलसाड हापूसला स्वतंत्र जीआय मानांकन मिळावे यासाठीच्या अर्जावर चेन्नईत सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखीव आहे. कोकणातील आंबा उत्पादकांमध्ये संताप उसळला आहे.

हापूसच्या जीआय मानांकनावरून वाद, कोकणातील उत्पादक संतप्त

कोकणचा हापूस म्हणजे राज्याची ओळख आहे. मात्र आता या हापूसच्या जीआय मानांकनावरून वाद पेटला आहे. गुजरातच्या ‘वलसाड हापूस’ला स्वतंत्र जीआय मानांकन मिळावे यासाठी करण्यात आलेल्या अर्जावरील अंतिम सुनावणी चेन्नईतील जीआय रजिस्ट्रीसमोर पूर्ण झाली असून निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

वाद नेमका काय?

२०१८ मध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांसाठी ‘कोकण हापूस’ला पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन मिळाले होते. मात्र २०२३ मध्ये गुजरातच्या गांधीनगर आणि नवसारी कृषी विद्यापीठाने ‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र जीआय मानांकन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला. कोकणचा हापूस पळवण्याचा आणि त्याची ओळख पुसण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आंबा उत्पादकांनी केला आहे. कोकण कृषी विद्यापीठ आणि कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थेने या अर्जावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे.

उत्पादकांची ठाम भूमिका

चेन्नई जीआय रजिस्ट्रीने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवत दोन्ही पक्षांनी वादावर सामंजस्याने मार्ग काढावा, अशी सूचना केली आहे. मात्र कोकणातील आंबा उत्पादकांनी हापूस या नावावर तडजोड करणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. हापूस या नावाच्या चोरीविरोधात रस्त्यावर उतरण्याचा आक्रमक पवित्राही आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे. हापूस आंब्याचा मूळ इतिहास, कोकणातील विशिष्ट हवामान, जमीन आणि या फळाशी जोडलेली कोकणची अस्मिता याचे भक्कम पुरावे कोकणच्या बाजूने जीआय रजिस्ट्रीसमोर सादर करण्यात आले आहेत. जीआय मानांकनासंदर्भात आम्ही आमची बाजू मांडू, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले आहे. जर निकाल कोकणच्या विरोधात गेला किंवा हापूसच्या नावावर तडजोड करण्याचा प्रयत्न झाला, तर हापूसवरून महाराष्ट्र आणि गुजरात असा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance