स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने सरकारला डिसेंबर २०२७ पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच ७ डिसेंबर रोजी विधानमंडळावर भव्य हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांतील आणि तालुका स्तरावरील प्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
११ जिल्ह्यांतील प्रतिनिधी सहभागी होणार
माजी राज्यमंत्री आणि पूर्व विदर्भाचे अध्यक्ष डॉ. रमेशकुमार गजबे यांनी या आंदोलनाची माहिती दिली. समितीचे नेते ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा ते सोळा वर्षांपासून स्वतंत्र विदर्भासाठी लढा सुरू आहे. सरकारने डिसेंबर २०२७ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसे न झाल्यास पुढील दिशा ठरवली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
भाजप आणि काँग्रेसवर नाराजी
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र विदर्भाबाबत केवळ ठराव आणि आश्वासने दिली आहेत. त्यांनी कधीही त्याची अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्ती दाखवली नाही, असा आरोप डॉ. गजबे यांनी केला. दोन्ही पक्षांकडून आता आमच्या अपेक्षा राहिल्या नाहीत, असेही ते म्हणाले. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी स्वतंत्र विदर्भाबाबत दिलेल्या आश्वासनांचा आणि ठरावांचा दाखला देत, दोन्ही पक्ष अजूनही ते प्रत्यक्षात आणण्याच्या मनस्थितीत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
Leave a Reply