ठाणे जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंच्या सुप्त गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘खासदार क्रीडा संग्राम’चे डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडले. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या भव्य क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मंत्री दादा भुसे, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री उदय सामंत आणि आमदार राजेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
३२ ठिकाणी ३२ खेळ; ७५ हजार स्पर्धक
या क्रीडा संग्रामांतर्गत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील ३२ विविध ठिकाणी तब्बल ३२ प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांना जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, तब्बल ७५ हजार स्पर्धकांनी यात आपला सहभाग नोंदवला आहे.
२०३६ च्या ऑलिम्पिकचे ध्येय
उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या उपक्रमामागील आपली भूमिका स्पष्ट केली. परिसरातील अनेक तरुण खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता असूनही योग्य व्यासपीठाअभावी त्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही, असे ते म्हणाले. स्थानिक पातळीवरील हेच टॅलेंट शोधून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी खासदार क्रीडा संग्राम सुरू करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्याचे स्वप्न असून, त्यादृष्टीने देशपातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले. भविष्यात भारतात ऑलिम्पिक झाल्यास, त्यात ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनीही देशाचे प्रतिनिधित्व करावे आणि पदके जिंकावीत, हा या क्रीडा संग्रामाचा मुख्य उद्देश असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक खेळाडूंना योग्य संधी, प्रोत्साहन आणि अद्ययावत व्यासपीठ उपलब्ध करून देत भविष्यातील ऑलिम्पिकपटू घडवण्याच्या दिशेने हा उपक्रम एक मैलाचा दगड ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. या उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply