अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याचे रशियाशी असलेले संबंध नव्या तपासामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याच्या अमेरिकेतील संशयास्पद मृत्यूनंतर सुरू झालेल्या नव्या तपासात महिलांचे जाळे, रशियन धनकुबेरांशी मैत्री आणि क्रेमलिनमधील प्रभावशाली व्यक्तींपर्यंत पोहोचण्याची धडपड अशा अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे.
मॉडेलिंगच्या नावाखाली तरुण महिलांचे जाळे
रशियातील महिलांशी एपस्टीनचे संबंध मॉडेलिंगच्या व्यवसायातून वाढले. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर पूर्व युरोपमधील अनेक तरुणी आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्नशील होत्या. याच संधीचा वापर एपस्टीनने केल्याचे तपासात समोर आले आहे. फ्रेंच मॉडेलिंग एजंट जीन ल्युक ब्रुनेल याच्याशी त्याचे जवळचे संबंध होते.
ब्रुनेलच्या माध्यमातून तरुणींना अमेरिका आणि युरोपमधील मॉडेलिंगच्या संधी देण्याचे आमिष दाखवले जात होते. तपासानंतर माजी सोव्हिएत संघातील किमान १७ महिला एपस्टीनच्या लैंगिक शोषण आणि तस्करीच्या जाळ्यात ओढल्या गेल्या होत्या. काही महिलांना नोकरी, व्हिसा आणि राहण्याची व्यवस्था देण्याच्या नावाखाली त्याच्यावर अवलंबून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे पीडितांनी सांगितले आहे.
रशियन धनकुबेरांशी मैत्री आणि पुतीन भेटीचे प्रयत्न
२००८ मध्ये अल्पवयीन मुलींशी संबंधित लैंगिक गुन्ह्यात दोषी ठरवल्यानंतर एपस्टीनची प्रतिमा मोठ्या प्रमाणात खराब झाली होती. त्यानंतर त्याने रशियातील प्रभावशाली व्यावसायिकांशी संबंध वाढवण्यास सुरुवात केली. रशियन अब्जाधीश व्लादिस्लाव डोरोनीन यांच्याशी त्याचे संबंध होते. दोघांमध्ये मॉस्कोमधील कोट्यवधी डॉलर्सच्या रिअल इस्टेट प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याचे ई-मेलमधून समोर आले. याशिवाय अॅल्युमिनियम उद्योगातील उद्योगपती ओलेग डेरीपास्का याच्याशी संपर्क साधण्याचाही एपस्टीनने प्रयत्न केला होता. मात्र त्यांची प्रत्यक्षात भेट झाली नाही. रशियातील श्रीमंत उद्योगपतींच्या संपर्कातून आर्थिक संधी आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवणे हा त्याच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग होता.
एपस्टीनची सर्वात मोठी महत्त्वाकांक्षा म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची वैयक्तिक भेट घेणे. २०११ मध्ये त्याने पुतीन यांच्याशी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुतीन यांची भेट झाल्याचे किंवा एपस्टीन रशियन गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे तपासात आढळलेले नाहीत. ऑगस्ट २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात एपस्टीनचा मृत्यू झाला. अधिकृतरीत्या तो आत्महत्या असल्याचे घोषित करण्यात आले.
एपस्टीनला रशियामध्ये फक्त महिलांमध्येच रस नव्हता, तर तेथील श्रीमंत आणि राजकीय वर्तुळातील व्यक्तींशी संबंध आणि मैत्री निर्माण करून स्वतःची प्रतिमा सुधारण्याचीही त्याची महत्त्वाकांक्षा होती. सध्या अमेरिकेत याबाबत न्यायालयात खटला सुरू असून हळूहळू यामागील उलगडा होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात याबाबत विश्लेषक चर्चा करत आहेत.
Leave a Reply