महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरून राजकारण तापलेले असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी केला आहे.
रोहित पवार यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती असल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उमेश पाटील यांचा दावा काय?
रोहित पवार पक्षात वेगळे पडले आहेत का, या प्रश्नावर बोलताना उमेश पाटील यांनी वेगळीच माहिती समोर आणली. रोहित पवार हे विद्या प्रतिष्ठानच्या संचालक मंडळावर नसल्यामुळे ते बैठकीला उपस्थित नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासोबत त्यांची बैठक झाल्याचीही चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. या दाव्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून रोहित पवार किंवा काँग्रेस यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्हीएसआर कंपनी आणि मुख्यमंत्र्यांवरील टीका
अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात रोहित पवार यांनी केलेल्या संशोधनाचे आपण कौतुकच केल्याचे उमेश पाटील म्हणाले. व्हीएसआर कंपनीच्या कामकाजाबाबत रोहित पवार यांनी खोलात जाऊन माहिती घेतली, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला जाणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणात संबंधित व्यक्तींना दोषी ठरवण्याआधी वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांच्या विधानातून दिसून आले.
रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवरही उमेश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी मांडलेल्या भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले, मात्र मुख्यमंत्र्यांबाबत केलेली टीका योग्य वाटली नाही, असे ते म्हणाले. ‘मफलरमॅन’चा उल्लेख करून सस्पेन्स निर्माण करणे आणि अजित पवारांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करणे चुकीचे असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
Leave a Reply