ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले असून त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. उषा यांनी स्वबळावर मनोरंजन क्षेत्रात नाव कमावले आहे. त्यांनी काही काळापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सिनेसृष्टीतील कलाकारांबाबत आणि त्यांच्या स्वभावाबाबत सांगितले. या मुलाखतीत त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील काही लोकांवर टीकाही केली, मात्र अलका कुबल, विक्रम गोखले आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या अनेक आठवणीही सांगितल्या.
मुलाखतीदरम्यान उषा नाडकर्णी यांनी अक्षय कुमार आणि जॅकी श्रॉफ यांच्याबाबतही सांगितले. त्या म्हणाल्या, जेव्हा माझ्या पवित्र रिश्ता या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते, तेव्हा जवळच अक्षय कुमारच्या रावडी राठोड या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. मी तिथे गेले. अक्षय कुमारने लगेच माझ्याकडे पाहिले आणि मग गप्पा-गोष्टी सुरू झाल्या. त्याचे मेकअप आर्टिस्ट वगैरे सगळे अगदी छान बोलतात, असेही त्या म्हणाल्या.
अलका कुबल यांच्याशी जवळचे नाते
उषा नाडकर्णी यांनी अलका कुबल यांच्याबद्दल सांगितले की, तिचे आणि माझे व्हॉट्सअॅप चॅट सुरूच असते. कधी कधी ती कॉलही करते. दोघींमधील हे जवळचे नाते आजही कायम आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल बोलताना त्या भावूक झाल्या. त्यांनी नशीबवान या चित्रपटात सोबत काम केले आहे. खूप छान अभिनेता आणि स्वभावाचा धनी होता तो, असे त्या म्हणाल्या. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी सांगितले की, चालू नाटकादरम्यान जर मी दिसले, तर तो नाटकातच काहीतरी नाव घेऊन ओळ म्हणायचा. खूप दिलखुलास होता तो. लक्ष्याची ही खोडकर सवय त्यांना खूप आवडायची, असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply