अनेकदा आपण डोंगराळ भागात सुट्टी घालवून आलो की तिकडच्या गोष्टी आठवतात. डोंगरदऱ्या म्हणजे मॅग्गी आणि चहा! पण एकदा का सहलीवरून परत आलो की तिकडचा चहा प्यावासा वाटतो. मग अशावेळी काय करावे सुचत नाही. मात्र, हा चहा तुम्ही घरीच बनवू शकता. फूड कंटेंट क्रिएटर आणि होम शेफ श्रुती महाजन हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पहाडी चहाची झटपट होणारी रेसिपी शेअर केली आहे. श्रुतीने हा चहा पहिल्यांदा उत्तरकाशीमध्ये चाखून पाहिला होता, असेही तिने सांगितले आहे. चला, हा चहा नेमका कसा बनवायचा ते पाहूया.
लागणारे साहित्य
खाली दिलेल्या साहित्यामध्ये साधारण तीन लोकांसाठी हा चहा तयार होतो. यासाठी दीड कप पाणी, एक इंच आल्याचा तुकडा, पाच ते सहा तुळशीची पाने, १२ ते १५ पुदिन्याची पाने, तीन ते चार लवंगा, दोन वेलदोडे, दोन ते तीन चमचे चहापत्ती, आवश्यकतेनुसार दूध आणि चवीनुसार गूळ लागेल.
कसा बनवायचा हा पहाडी चहा?
सगळ्यात आधी आले, तुळशीची पाने, पुदिना, लवंग आणि वेलची यांना छान ठेचून घ्या. याची पूड न करता फक्त जाडसर कुटून घ्यायचे आहे. आता एका चहाच्या पातेल्यात दीड कप पाणी घालून त्यात ठेचून बनवलेला मसाला टाका. आता हे पाणी छान पाच मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. यामुळे मसाले पाण्यात छान मिसळून जातील आणि स्वाद सोडतील. यानंतर या पाण्यात चहापत्ती घाला आणि दोन मिनिटे छान उकळून घ्या. दोन मिनिटांनंतर त्यात दूध घालून पुन्हा एकदा दोन मिनिटे छान उकळून घ्या. चहा चांगला उकळला की, त्यात चवीनुसार गूळ घाला. गूळ पूर्णपणे विरघळल्यावर गॅस बंद करा. अशा प्रकारे तुमचा चविष्ट पहाडी चहा पिण्यासाठी तयार आहे.
Leave a Reply