महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्याची नोंद आता देशाच्या सीमेपलीकडेही घेतली गेली आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित ‘साऊथ एशिया डेमोक्रसी कॉन्फरन्स २०२६’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत या आंदोलनावर आधारित शोधनिबंध सादर करण्यात आला.
शोधनिबंधातून आंदोलनाचा व्यापक अभ्यास
‘द अनफिनिश्ड प्रॉमिस ऑफ डेमोक्रसी : द नामांतर आंदोलन, कास्ट अँड द स्ट्रगल फॉर डेमोक्रॅटिक इक्वॅलिटी इन महाराष्ट्र, इंडिया’ या शीर्षकाच्या शोधनिबंधात संशोधक रवींद्र नन्नवरे यांनी नामांतर आंदोलनाचा सामाजिक, राजकीय आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अभ्यास मांडला. हे आंदोलन केवळ एका विद्यापीठाचे नाव बदलण्यापुरते मर्यादित नव्हते, तर सामाजिक प्रतिष्ठा, स्वाभिमान, समानता आणि घटनात्मक अधिकारांसाठीचा व्यापक संघर्ष होता, असे त्यांनी अधोरेखित केले.
परिषदेत विविध देशांतील तज्ज्ञांचा सहभाग
या परिषदेत विविध देशांतील संशोधक, प्राध्यापक, कायदेतज्ज्ञ आणि नागरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. दक्षिण आशियातील लोकशाही, मानवी हक्क आणि सामाजिक चळवळी या विषयांवर या वेळी चर्चा झाली.
नन्नवरे यांचा शैक्षणिक प्रवास संघर्षमय राहिला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मोहरद गावचे रहिवासी असलेले नन्नवरे यांनी मुंबईतील निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथे शिक्षण घेतले. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी शेतात तसेच हॉटेल आणि बिअर बारमध्ये काम करून शिक्षण पूर्ण केले. सध्या ते स्वतंत्र संशोधक आणि ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.
Leave a Reply