कळवण तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन आर. के. एम. विद्यालय, कळवण येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमता वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे आणि आधुनिक अध्यापन पद्धतींची ओळख करून देणे हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
शिक्षकांच्या सेवाविषयक प्रगतीमध्ये निवडश्रेणी प्रशिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना शैक्षणिक धोरणे, अध्यापनातील विविध कौशल्ये, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, शैक्षणिक गुणवत्ता आणि बदलत्या शैक्षणिक प्रवाहांविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
हे प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी तेजश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण वराडे, सतीश खंदारे आणि शीतल कोठावदे हे प्रशिक्षणाचे काम पाहत आहेत. सुलभक म्हणून केंद्रप्रमुख गणेश परदेशी, मयुरी पंडित, सोनाली चव्हाण, शरदचंद्र काकुस्ते, रेवती निकम आणि अभिनंदन धात्रक काम करत आहेत.
प्रशिक्षणाच्या यशासाठी प्रयत्न
प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी केंद्रप्रमुख कांतीलाल बागुल, अनिता बागुल, विशेष शिक्षक विजय पगारे, सागर ब्राह्मणकर, किरण भोये, नामदेव महाले, जगन महाले, योगिता फड, पूजा जाधव आणि शारदा पाटील परिश्रम घेत आहेत. या प्रशिक्षणातून शिक्षकांना नव्या अध्यापन पद्धती आत्मसात करता येतील आणि त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply