नवी मुंबईत रस्ते आणि महामार्गांचे जाळे विस्तारत असताना रस्ते अपघातांतील मृत्यूंचा आकडा मात्र चिंताजनक बनला आहे. गेल्या तीन वर्षांत शहरात झालेल्या रस्ते अपघातांत तब्बल ८५५ जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक असून, एकूण मृतांपैकी ५३ टक्के दुचाकीस्वार आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांमध्ये सुमारे ८० टक्के तरुण आहेत.
दहा महिन्यांतील आकडेवारी
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार वाहतूक विभागाने ऑक्टोबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील ६७२ रस्ते अपघातांचा अभ्यास केला. या विश्लेषणानुसार, जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या १० महिन्यांत २२८ अपघातांमध्ये २४३ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये १२० दुचाकीस्वारांचा समावेश आहे. याशिवाय याच कालावधीत ८० पादचाऱ्यांनाही अपघातांत प्राण गमवावे लागले आहेत.
सकाळी आणि मध्यरात्री अपघातांचे प्रमाण अधिक
वाहतूक विभागाच्या अभ्यासात अपघातांच्या वेळेचे विश्लेषणही करण्यात आले आहे. सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत सर्वाधिक ३१.१४ टक्के अपघातांची नोंद झाली आहे, तर मध्यरात्री १२ ते सकाळी ६ या कालावधीत २८.५१ टक्के अपघात झाले आहेत. सकाळच्या वर्दळीच्या वेळेबरोबरच मध्यरात्रीही अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. रात्रीच्या वेळी वेगावर नियंत्रण, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि वाहनचालकांची सतर्कता यांचे महत्त्व या आकडेवारीतून अधोरेखित होत आहे.
चार हजार कॅमेरे, ५२२ कर्मचारी
शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुमारे चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहतूक विभागाचे ५२२ कर्मचारी कार्यरत आहेत. सिग्नल यंत्रणा, सीसीटीव्ही निरीक्षण आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध असतानाही अपघातांतील मृत्यूंची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे केवळ सीसीटीव्ही आणि मनुष्यबळ वाढवून उपयोग नसून, अपघातप्रवण ठिकाणांची ओळख, वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, रस्त्यांवरील धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.
वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि निर्धारित वेगमर्यादेतच वाहन चालवावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी केले आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही वाहतुकीच्या नियमांबाबत अधिक जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे.
Leave a Reply