फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे क्वाड शिखर परिषद सुरू आहे. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारताचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित एक क्षण समोर आला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
क्वाड देशांचे नेते छायाचित्र काढण्यासाठी मंचावर येत असताना ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे मंचावरील आपापल्या ठरलेल्या जागेकडे जात होते.
जमिनीवर तिरंगा दिसताच मोदींनी काय केलं?
आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये नेत्यांनी कुठे उभं राहायचं हे दाखवण्यासाठी जमिनीवर लहान चिन्हं किंवा ध्वज ठेवले जातात. पंतप्रधान मोदी आपल्या जागेकडे जात असताना त्यांची नजर अचानक जमिनीवर पडली. त्यांना जमिनीवर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा ठेवलेला दिसला.
व्हिडिओमध्ये दिसतं की, पंतप्रधान मोदींनी जमिनीवर पडलेला तिरंगा पाहताच क्षणाचाही विलंब न करता खाली वाकून तो आदराने उचलला आणि आपल्या खिशात ठेवला. त्यांनी जवळच उभ्या असलेल्या जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्याशी याबद्दल चर्चा केली. पंतप्रधान मोदींना तिरंगा उचलताना पाहून ट्रम्प यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी मोदींच्या पाठीवर हात ठेवून ‘याला जपून ठेवा’ असं म्हटलं.
दोन वर्षांनंतरची क्वाड बैठक
पंतप्रधान मोदींच्या या छोट्याशा कृतीने उपस्थित परदेशी पाहुण्यांचं आणि जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं. लहान-मोठ्या प्रत्येक प्रसंगी ते देशाच्या सन्मानाला प्राधान्य देतात, हे या कृतीतून दिसून आलं.
दोन वर्षांच्या खंडानंतर मनिला येथे झालेल्या या क्वाड बैठकीत अनेक महत्त्वाच्या भू-राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर चर्चा झाली. चारही देशांनी इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा राखण्याच्या महत्त्वावर भर दिला. सागरी मार्गांची सुरक्षा आणि नौकानयनाचं स्वातंत्र्य सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. जागतिक पुरवठा साखळी मजबूत करणं, महत्त्वपूर्ण खनिजं आणि सेमीकंडक्टर तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवणं यावर सविस्तर चर्चा झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल पायाभूत सुविधा आणि नव्या तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करून सुरक्षित नेटवर्क तयार करण्यावर सहमती झाली. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, मानवतावादी मदत आणि आरोग्य सुरक्षा या क्षेत्रांत एकत्र काम करण्यासाठी ठोस पावलं उचलण्यात आली. इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सुरक्षेसंदर्भात चीनच्या हालचाली आणि राजनैतिक निर्णयांवरही चर्चा झाली.
Leave a Reply