बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कॉलनी रस्त्यांसाठी ८० टक्के निधी राखीव ठेवा

कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या कॉलनी रोडची दुरवस्था झाली आहे. आगामी अर्थसंकल्पात ८० टक्के निधी कॉलनी रोडसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी आमदार फरांदे यांनी केली आहे.

कॉलनी रस्त्यांसाठी ८० टक्के निधी राखीव ठेवा

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक शहरातील मुख्य रस्त्यांची कामे सुरू असताना त्याचा भार अंतर्गत कॉलनी रोडवर पडला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वापर झाल्याने अनेक कॉलनी रोड उखडले असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका अर्थसंकल्पात रस्ते विकासासाठीच्या एकूण तरतुदीपैकी किमान ८० टक्के निधी केवळ कॉलनी रोडच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था

मुख्य रस्त्यांची कामे सुरू झाल्यापासून जड वाहतूकही कॉलनी रोडवरून वळविण्यात आली. त्यामुळे अनेक भागांतील डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. काही ठिकाणी रस्ताच शिल्लक राहिला नसल्याची स्थिती आहे. याचा फटका दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना खड्ड्यांमधून मार्ग काढताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. मुख्य रस्त्यांच्या विकासासाठी कॉलनी रोडचा वापर केला गेला, पण त्यांची दुरवस्था झाल्यानंतर दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.

सर्वेक्षण आणि कालबद्ध कृती आराखड्याची मागणी

कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात मोठी विकासकामे होत असताना केवळ मुख्य रस्तेच चांगले करून चालणार नाही, तर प्रत्येक वसाहतीतील अंतर्गत रस्ताही सुस्थितीत असला पाहिजे, अशी भूमिका आमदार फरांदे यांनी मांडली आहे. शहरातील सर्व प्रभागांमधील खराब कॉलनी रोडचे प्राधान्यक्रमाने सर्वेक्षण करावे. त्यानंतर गरजेनुसार डांबरीकरण, काँक्रिटीकरण किंवा संपूर्ण पुनर्निर्माणाची कामे हाती घ्यावीत, अशीही त्यांनी मागणी केली आहे. या कामांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी आणि राखीव निधी दुसऱ्या कोणत्याही कामासाठी वळविला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पत्रात नमूद आहे. रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता नियमितपणे तपासावी आणि ठरलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आगामी अर्थसंकल्पात कॉलनी रोडसाठी ८० टक्के निधी राखीव ठेवून कालबद्ध कृती आराखडा तयार करावा आणि प्रत्यक्ष कामांना तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी आमदार फरांदे यांनी केली आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance