बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

गुलाबराव देवकर, पवारांनी घात केला; सतीश पाटीलांचा आरोप

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी गुलाबराव देवकर आणि संजय पवार यांच्यावर घाताचा आरोप केला.

गुलाबराव देवकर, पवारांनी घात केला; सतीश पाटीलांचा आरोप

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणावर विश्वास ठेवावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे संचालक डॉ. सतीश पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. हे दोघे राष्ट्रवादी पक्ष स्वतःचा समजतात आणि स्वतःच्याच घरात बँकेच्या संचालकपदाची उमेदवारी कशी राहील, याची त्यांनी दक्षता घेतली, असे डॉ. पाटील म्हणाले. माझा सहकारातील २० वर्षांचा अनुभव आहे, त्याचा जराही विचार केला नाही. माझ्यावर या दोघांनी अन्याय करून माझा घात केला, असा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

पाटीलांचा आरोप

माजी मंत्री डॉ. पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ते बोलत होते. मला सोमवार (ता. १६)पर्यंत सांगण्यात आले की तुमची उमेदवारी पक्की आहे. मंगळवारी (ता. १७) दुपारी पावणेतीनला मला सांगण्यात आले की तुम्ही माघारी घ्या. मी एकटा पडल्याने मला माघार घ्यावी लागली, असे डॉ. पाटील म्हणाले. पक्षात कोणावर विश्वास ठेवावा, अशी स्थिती आहे. डॉ. सतीश पाटील पुढे आपल्याला जड जातील, असे वाटले. यामुळे माझा घात करून तिकीट कापले. यापुढे एकटा लढणार आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

देवकरांचे स्पष्टीकरण

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. सोमवारी विश्रामगृहात महायुतीची बैठक होती. आमदार अनिल पाटील, मी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार आणि डॉ. सतीश पाटील उपस्थित होते, असे देवकर म्हणाले. महायुतीत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आम्हाला सांगितले की राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे. आमचे अधिक आमदार, खासदार आहेत. यामुळे तुम्हाला आमदाराच्या प्रमाणात जागा देऊ. आम्ही त्यांना सांगितले की चार जागा आम्हाला हव्यात. बैठकीत रात्री मंत्री महाजन यांना हस्तांदोलन करून माझी जागा पक्की ठेवा, असे सांगून डॉ. सतीश पाटील निघून गेले.

रात्री उशिरापर्यंत आम्ही महाजनांकडे ओबीसी जागा आम्हाला मिळायला पाहिजे, असा आग्रह धरला होता. ती जागा आमच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली नाही. डॉ. पाटील यांचा आरोप चुकीचा आहे. डॉ. पाटील यांचा घात करण्याचा संबंध नाही. तेही सोबत होते. त्यांच्यासमक्ष चर्चा झाली. महाजनांनी होय सांगितले होते. त्यानंतरही आम्ही महाजनांना सांगितले होते की ओबीसी आम्हाला द्या. डॉ. पाटील यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. तीन जागाच मिळाल्या. चौथ्या जागेचा आग्रह होता. नंतर समजले की तीनच जागा मिळाल्या. जो निर्णय झाला, तो महायुतीने घेतला, तो स्वीकारावा लागेल, असे देवकर म्हणाले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance