जिल्हा पुरवठा विभागाच्या धान्य एटीएमला शिधापत्रिकाधारक लाभार्थींचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. एक हजारांहून अधिक लाभार्थींनी या मशिनमधून धान्य घेतले आहे. विशेषतः दिवाळीच्या काळात लाभार्थींसाठी हे एटीएम मोठा आधार ठरले. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये डिसेंबरअखेरपर्यंत आणखी दहा एटीएम सुरू करण्याची तयारी जिल्हा पुरवठा विभागाने केली आहे.
हजारांहून अधिक लाभार्थींनी घेतला लाभ
स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेंतर्गत नाशिक रोड येथील जुन्या धान्य वितरण अधिकारी कार्यालयात धान्य एटीएम कार्यान्वित करण्यात आले. राज्यातील या पायलट प्रकल्पाला लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या महिनाभरात हजारांहून अधिक लाभार्थींनी या एटीएममधून धान्य घेतले आहे. प्रायोगिक स्तरावर हा प्रकल्प यशस्वी ठरल्याने जिल्हा पुरवठा विभागाने आता नाशिक शहर आणि त्यानंतर ग्रामीण भागात त्याचा विस्तार करण्याचा पुढाकार घेतला आहे.
शहरात दहा, येवल्यात एक एटीएम
जिल्हा पुरवठा विभागातर्फे नाशिक शहरात विविध दहा ठिकाणी तसेच येवल्यात एका ठिकाणी मशिन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील प्रस्ताव पुरवठा विभागाने राज्यस्तरावर सादर केला असून, तो अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल आणि त्यानुसार डिसेंबरअखेरपर्यंत शहरातील दहा ठिकाणी एटीएम मशिन कार्यान्वित होतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली आहे.
लाभार्थींची परवड थांबणार
शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत धान्य दिले जाते. महिन्याकाठी स्वस्त धान्य दुकानांमधून हे धान्य वाटले जाते. मात्र दुकानांच्या वेळा, काही ठिकाणी दुकानदारांची मनमानी आणि ठराविक मर्यादेपेक्षा कमी प्रमाणात मिळणारे धान्य अशा विविध समस्यांना लाभार्थींना सामोरे जावे लागते. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारतर्फे व्यवस्थेत आमूलाग्र बदल केला जात आहे. या बदलांचा भाग म्हणून एटीएमचा पर्याय पुढे आला आहे. या व्यवस्थेमुळे भविष्यात लाभार्थींची परवड कायमस्वरूपी थांबणार आहे.
Leave a Reply