नांदगावमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सलग तिसऱ्या दिवशीही विस्कळीत राहिला आहे. एका खासगी टेलिफोन कंपनीने भूमिगत केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामात गिरणा धरणावरील ५६ खेडी नळपाणी पुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहरालगतच्या श्रीराम नगर आणि गिरणा नगरसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
फुटलेली जलवाहिनी १५० मिलिमीटर व्यासाची असून ती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीत येते. मात्र खोदकामासाठी केवळ नगरपालिकेची परवानगी घेण्यात आली होती. महामार्ग प्राधिकरण, संबंधित ग्रामपंचायती किंवा जिल्हा परिषद यांची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. जलवाहिनीचे अचूक मॅपिंग न करताच खोदाई करण्यात आल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
बायपासचा प्रस्ताव; कंपनीचा होकार नाही
घटनेनंतर तीन दिवस उलटूनही खराब झालेली जलवाहिनी पूर्वपदावर आलेली नाही. दुरुस्ती पथकाने फुटलेल्या भागाला पर्याय म्हणून १५० मिलिमीटर व्यासाची आणि २०० फूट लांबीची नवीन जलवाहिनी बायपास पद्धतीने टाकण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र संबंधित टेलिफोन कंपनीने त्याला होकार दिलेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार, याबाबत संभ्रम कायम आहे.
शहरातील भागात कंपनीच्या खोदकामामुळे झालेल्या नुकसानीपोटी पालिकेने चार लाख रुपयांची नुकसानभरपाई वसूल केली आहे. मात्र ग्रामीण भागातील नुकसानीबाबत अशी कोणतीही वसुली झालेली नाही. दुरुस्तीचा संपूर्ण खर्च देण्याबाबत कंपनीकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप होत आहे. जलवाहिनी फुटण्याची जबाबदारी कोण घेणार आणि दुरुस्तीचा खर्च कोण भरणार, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. गायत्री हॉटेलजवळ फुटलेल्या जलवाहिनीची आणि मनमाड रस्त्यावर शिवसृष्टीसमोरील ग्रामीण जलवाहिनीची दुरुस्ती सध्या सुरू आहे.
Leave a Reply