गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँकेत १२ जागा बिनविरोध; ९ साठी २९ ला मतदान

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत १२ जागा बिनविरोध झाल्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह १२ उमेदवार बिनविरोध निवडले गेले.

जळगाव जिल्हा बँकेत १२ जागा बिनविरोध; ९ साठी २९ ला मतदान

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी, १७ तारखेला, नाट्यमय घडामोडी घडल्या. त्या दिवशी आठ जागा आणि यापूर्वीच्या चार जागा अशा एकूण १२ जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. बिनविरोध झालेल्या उमेदवारांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार आणि आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचा समावेश आहे.

४१ उमेदवार रिंगणात; चिन्हवाटप आज

या निवडणुकीसाठी एकूण २४१ उमेदवारांनी ४०२ अर्ज दाखल केले होते. माघारीच्या अखेरच्या दिवशी एकूण २०० उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे आता ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. उर्वरित ९ जागांसाठी २९ तारखेला मतदान होणार असून, आज चिन्हवाटप होत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते उमेदवारी देणे आणि माघार घेण्यापर्यंत शह-काटशहाचे राजकारण पाहायला मिळाले. महायुती असूनही अनेक ठिकाणी भाजपविरुद्ध शिवसेनेने, तर काही ठिकाणी शिवसेनेविरुद्ध भाजपच्या इच्छुकांनी अर्ज भरले होते.

जागावाटपाचा तिढा शेवटपर्यंत कायम

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील जागावाटपाचा तिढा माघारीपर्यंत आणि नंतरही कायम राहिला. पालकमंत्री, जलसंपदामंत्री, आमदार आणि खासदारांच्या बैठकीत भाजपला १० जागा, शिवसेनेला सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र तो शेवटपर्यंत टिकला नाही. मुक्ताईनगरची जागा शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपला सोडण्यास नकार दिल्याने तेथे बंडखोरी झाली आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीला एक ते दोन जागा दिल्या जातील, असे सांगण्यात आले होते. मात्र शेवटपर्यंत एकही जागा महाविकास आघाडीला सोडण्यात आली नाही. महायुतीने विश्वासघात केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.

या लढतींकडे लक्ष

मुक्ताईनगर विविध कार्यकारी मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या देवयानी देशमुख आणि चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण (भाजप) यांच्याविरुद्ध शिवसेनेचे विजय पाटील व नारायण पाटील यांच्यात लढत होणार आहे. या लढतींकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance