संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यात जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांना गती देण्यात येणार आहे. जिल्ह्याला एक लाख जलतारा शोषखड्डे निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले असून पहिल्या टप्प्यात २५ हजार शोषखड्डे तयार करण्याचे नियोजन आहे. ही कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहेत. या कामांचा नियमित आढावाही प्रशासनस्तरावर घेतला जाणार आहे.
आतापर्यंत चार हजार शोषखड्डे तयार
जिल्ह्यातील पीक परिस्थिती, चारा उपलब्धता, पाणीटंचाई, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि रोजगार उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत जलतारा प्रकल्पाबाबत नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे चार हजार शोषखड्डे तयार झाले आहेत. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले. प्रत्येक गटविकास अधिकाऱ्याने किमान २५ शोषखड्ड्यांच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. अधिकाऱ्यांनी स्वतःच्या निवासस्थानी आणि कार्यालय परिसरात शोषखड्डे तयार करून नागरिकांसमोर आदर्श ठेवावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी साठवण व भूजल पुनर्भरण वाढवावे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करावा. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची तयारी ठेवावी. नागरिक आणि जनावरांसाठी पाण्याचे स्वतंत्र नियोजन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहिमेलाही प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.
अनधिकृत नळजोडण्या बंद होणार
जिल्ह्यातील आठ नगर परिषदांमध्ये कचरा संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाटीची व्यवस्था सक्षम करावी. परभणी शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक दहा एकर जागेचा प्रश्न मार्गी लावावा. रात्रीच्या वेळीही कचरा संकलन करावे. जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टी व नळपट्टी वसुली वाढवून स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करावा. शाळा, अंगणवाडी आणि रुग्णालयांमध्ये स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता प्रत्यक्ष तपासावी.
परभणी शहरातील अनधिकृत नळजोडण्या पुढील १५ दिवसांत बंद कराव्यात. ज्या नागरिकांना नळजोडण्या नियमित करून घ्यायच्या आहेत, त्यांच्याकडून आवश्यक नळपट्टी भरून घेऊन नियमानुसार नियमितीकरण करावे. पाणी बचतीसाठी नागरिकांमध्ये जलसाक्षरता निर्माण करण्याबरोबरच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महानगरपालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून सर्व नगर परिषदांनी आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे.
जिंतूर शहराला तीन दिवसांआड, तर पाथरी आणि सोनपेठ येथे सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सोनपेठमधील काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सेलू शहरासाठी पुढील पाच महिन्यांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. गंगाखेड, मानवत आणि पालम शहरांच्या पाणीपुरवठा स्रोतांचाही आढावा घेण्यात आला. संभाव्य दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गावपातळीवर चारा लागवड योजनेची जनजागृती करावी. वैरण विकास योजनेच्या माध्यमातून चारा आणि बियाण्यांचे वितरण करण्यात येईल.
Leave a Reply