बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धाराशिवच्या स्मशानभूमींत असुविधा; निधनानंतरही यातना

धाराशिव स्मशानभूमींमध्ये स्वच्छता, पाणी आणि विजेचा अभाव आहे. कपिलधार येथील स्मशानभूमीची स्थिती सर्वाधिक दयनीय असून नागरिकांनी सुविधा देण्याची मागणी केली आहे.

धाराशिवच्या स्मशानभूमींत असुविधा; निधनानंतरही यातना

मृत्यूनंतर तरी व्यक्तीला शांततेत अखेरचा निरोप मिळावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र, धाराशिव शहरातील विविध स्मशानभूमींची दुरवस्था पाहता येथे निधनानंतरही मरणयातनाच वाट्याला येत असल्याचे चित्र आहे. स्वच्छतेचा अभाव, पाणी आणि विजेची टंचाई, तसेच विद्युत दाहिनीचा अभाव यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

कपिलधार स्मशानभूमीची दयनीय अवस्था

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना त्या तुलनेत स्मशानभूमींमधील मूलभूत सुविधांचा विकास पूर्णपणे रखडला आहे. अनेक ठिकाणी दहन ओटे अपुरे पडत आहेत आणि त्यावरील पत्रे गंजले आहेत. उन्हाळ्यात कडक उन्हात आणि पावसाळ्यात अंत्यविधी पार पाडताना नातेवाइकांचे हाल होत आहेत. स्मशानभूमीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे आणि गवत वाढले आहे. कपिलधार येथील सार्वजनिक स्मशानभूमीची सर्वाधिक दयनीय अवस्था आहे. तेथील संरक्षण भिंत तुटली आहे, विजेची आणि पाण्याची सोय नाही, तर प्रवेशद्वार नसल्याने स्मशानजोगीला मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे.

शहरात विविध समाजांच्या एकूण सात स्मशानभूमी आहेत. त्यातील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची स्थिती काहीशी बरी आहे; मात्र, इतर ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव आहे. शहरात किती स्मशानभूमी आहेत, त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कोणाची आहे आणि तेथील सद्यःस्थिती कशी आहे, याचीदेखील नगरपालिका प्रशासनाला माहिती नसल्याची स्थिती आहे. शहराच्या विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना संवेदनशील अशा स्मशानभूमींकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

या आहेत समस्या

अंत्यविधी आटोपल्यानंतर हातपाय धुण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी पाण्याची कायम टंचाई असते. अनेक ठिकाणचे नळ कोरडे पडले असून पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता होत नाही. सायंकाळी किंवा रात्री अंत्यविधी करावा लागल्यास पथदिवे आणि हायमास्ट दिवे बंद असल्याने नागरिकांचे हाल होतात. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बसण्यासाठी पुरेशी बाके किंवा निवारा शेड उपलब्ध नाहीत. शहरात एकही विद्युत दाहिनी नाही; त्यामुळे लाकडांचा वापर होत असल्याने वृक्षतोडीस प्रोत्साहन मिळते. अनेक स्मशानभूमींमध्ये महापालिकेमार्फत स्वस्त दरात लाकडे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना खासगी विक्रेत्यांकडून चढ्या दराने लाकडे विकत घ्यावी लागत आहेत.

नगरपालिकेने बोअरवेल घेतली नाही, त्यामुळे नागरिकांनी पैसे जमा करून कूपनलिका घेतली आणि झाडे जगवली, असे सामाजिक कार्यकर्ते मनोज कोचेटा यांनी सांगितले. नगरपालिकेकडून सोयी-सुविधांच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. हिंदू स्मशानभूमी दोन, मुस्लिम समाजाच्या दोन, तर लिंगायत, मातंग आणि बौद्ध समाजाची प्रत्येकी एक स्मशानभूमी आहे. रोटरी क्लबने छत उभारून दिले आहे. कपिलधार स्मशानभूमीचे स्मशानजोगी गणेश पवार म्हणाले की, सार्वजनिक स्मशानभूमीला प्रवेशद्वार नाही, जुनी दगडी संरक्षण भिंत ढासळली आहे, वेळेवर वीज नसते आणि पाण्याची पुरेशी सुविधा नाही. प्रशासनाने तातडीने या सर्व स्मशानभूमींची पाहणी करून दुरुस्ती, स्वच्छता आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance