बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

शिरवणे गावातील निवारा शेडवरील ‘नाना’ फलकावरून वाद

नेरूळमधील शिरवणे गावातील निवारा शेडवरील 'नाना' नामफलकावरून वाद निर्माण झाला आहे. नगरसेविकेने महापालिकेकडे लेखी आक्षेप नोंदवून तातडीने खुलासा मागितला आहे.

शिरवणे गावातील निवारा शेडवरील ‘नाना’ फलकावरून वाद

नेरूळमधील शिरवणे गावात एल. पी. विजयाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या निवारा शेडवरील ‘नाना’ या नामफलकावरून वाद निर्माण झाला आहे. या फलकामुळे शिरवणे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार यांनी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापकांकडे लेखी निवेदनाद्वारे आक्षेप नोंदविला आहे. तसेच निवारा शेडच्या उभारणीबाबत आणि नामफलक लावण्याच्या अधिकाराबाबत प्रशासनाकडून खुलासा करण्याची मागणी केली आहे.

ग्रामस्थांनी लावला नवा फलक

दरम्यान, शिरवणे ग्रामस्थांनी संबंधित ‘नाना’ नामफलक हटवून त्या जागी ‘शिरवणे गाव – एल.पी. बस स्टॉप – नेरूळ काटा’ असा नवीन फलक लावला आहे. शिरवणे गावाचे अस्तित्व आणि ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाकडे लेखी उत्तराची मागणी

शिरवणे गावातील हा निवारा शेड कोणत्या प्राधिकरणाच्या किंवा विभागाच्या अंतर्गत उभारण्यात आला, त्याच्या उभारणीमागील कारण काय आणि त्याला कोणाची मान्यता आहे, याची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी सुतार यांनी केली आहे. परिसरातील नामकरण करण्याचे अधिकार महापालिकेला असताना कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने नामफलक लावणे योग्य नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. ‘नाना’ असा नामफलक लावल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

नवीन नामफलक भविष्यात हटविण्यात येऊ नये, अशी विनंती सुतार यांनी प्रशासनाला केली आहे. अन्यथा शिरवणे गावातील भूमिपुत्र, भूमिकन्या आणि ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेऊन लेखी उत्तर द्यावे आणि भविष्यात अशा प्रकारचे नामफलक लावण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance