वडार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ चर्चा करून चालणार नाही, तर आता ठोस कृती करण्याची गरज आहे. समाजाच्या हक्कांसाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी वेळ पडल्यास हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरतील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी हा निर्धार व्यक्त केला. संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संजय भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोली सेक्टर १९ येथील सुनील चौगुले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या प्रांगणात भव्य ‘खेळ पैठणीचा’ आणि महिला सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चौगुले बोलत होते. नगरसेवक ममित चौगुले, नगरसेविका चांदणी चौगुले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार
वडार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महिलांचे सक्षमीकरण महत्त्वाचे असल्याचे सांगत चौगुले यांनी बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचा आराखडा मांडला. वडार आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुका स्तरावर महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निधीतून महिलांना स्वयंरोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वसतिगृहे
समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी वसतिगृहांची सुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. सोलापूर येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले असून, यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्याचे नियोजन आहे. अनाथ तसेच पालकांचे छत्र नसलेल्या मुलांच्या निवास आणि शिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे.
जालना येथेही वसतिगृह सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचा मानसही चौगुले यांनी व्यक्त केला.
शासनाच्या जागेवर वास्तव्यास असलेल्या वडार समाजातील कुटुंबांच्या घरांना अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच जातीचे दाखले मिळविताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मदत केली जाईल. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा आणि समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, या बाबींना संघटनेने प्राधान्य दिले असल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply