पालघर जिल्ह्यातील नावझे या आदिवासी गावाला शाश्वत विकासाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत हा सन्मान देण्यात आला. गावातील लोकांच्या सातत्यपूर्ण सहभागातून आणि सामूहिक प्रयत्नांतून झालेल्या बदलाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
नावझे गावाने आरोग्य, पोषण, शिक्षण, जलसंधारण आणि पर्यावरणीय शाश्वतता या क्षेत्रांत मोठी प्रगती केली आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन राबवलेल्या उपक्रमांमुळे गावाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला. या विकासप्रवासाला सोसायटी फॉर ह्युमन अँड एन्व्हायर्नमेंटल डेव्हलपमेंट या संस्थेसोबत राबवण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट रोशनी या उपक्रमाचे पाठबळ मिळाले आहे. रोश डायग्नोस्टिक्स इंडियाचा हा प्रमुख सामाजिक उपक्रम आहे.
दहा वर्षांत आरोग्यात लक्षणीय सुधारणा
२०१५ पासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे पालघर जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक लाभार्थी कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. गेल्या दहा वर्षांत जवळपास ३० टक्के महिलांच्या हिमोग्लोबिनच्या पातळीत सुधारणा झाली आहे. तसेच मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्यात या उपक्रमाने मोलाची भूमिका बजावली आहे, अशी माहिती सरपंच दामोदर लबाड यांनी दिली.
प्रत्येक बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आणि पोषणाची जाणीव असणे आवश्यक आहे. अशा अर्थपूर्ण सहकार्यामुळे व्यक्तींच्या जीवनात दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव घडवून आणणे शक्य होते, असे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तावडे यांनी सांगितले. लोकसहभाग आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गावाचा विकास कसा साधता येतो, याचे नावझे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
Leave a Reply