हिंगोली शहरातील मुख्य बाजारपेठेत राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांच्या शाखांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या बँकांमध्ये येणाऱ्या खातेदारांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था कागदावरच राहिली आहे. त्यामुळे वाहनतळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बँकांच्या शाखा थाटल्या जात असताना वाहनतळाच्या सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, पोस्ट ऑफिस रोड, रेल्वेस्टेशन रोड, नांदेड नाका ते शिवाजीनगर आणि नारायणनगर परिसरात राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांच्या जवळपास २० ते ३० शाखा कार्यरत आहेत. या भागात विविध वित्त कंपन्यांची कार्यालयेही थाटण्यात आली आहेत. या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने खातेदार आर्थिक व्यवहारांसाठी ये-जा करतात. मात्र बहुतांश बँकांकडे वाहनतळाची व्यवस्था नसल्याने ग्राहकांना आपली वाहने उभी करण्यासाठी जागा शोधावी लागते. अनेकजण नाइलाजाने रस्त्याच्या कडेला किंवा दुकानांसमोर वाहने उभी करतात. परिणामी आधीच वर्दळीच्या असलेल्या बाजारपेठेतील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. पादचारी आणि इतर वाहनधारकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.
जागामालक भाडे घेऊन मोकळे
शहरातील बहुतांश बँक शाखा या भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू आहेत. त्यासाठी संबंधित जागामालकांकडून दरमहा २० हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. मात्र एवढे मोठे भाडे देऊनही बँकांना वाहनतळासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होत नाही. जागामालक भाडे घेण्यापुरतेच मर्यादित राहत असल्याने वाहनतळाचा प्रश्न कायम आहे.
नवीन शाखा सुरू करताना अधिकारी, कर्मचारी आणि खातेदारांच्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र अनेक बँकांकडून या सुविधेकडे दुर्लक्ष केले जाते. शहरातील वाढती वाहनसंख्या आणि बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता बँक प्रशासनासह संबंधित यंत्रणांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहनतळाची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
खातेदारांना दंडाचा भुर्दंड
बाजारपेठेत बँक शाखांसमोरील रस्त्यावर उभ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीचाच झाला आहे. अशावेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला गेला, तर खातेदारांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. शहरातील कुठल्याही बँक शाखेत जायचे झाल्यास वाहन कुठे उभे करावे, हा प्रश्न नेहमीच पडतो, असे खातेदार सुभाष बोरकर यांनी सांगितले. प्रत्येक वाहनधारकाने वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. बँकांनीही आपल्या शाखेत येणाऱ्या खातेदारांची वाहने रस्त्यावर उभी राहणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गफार शेख यांनी सांगितले.
Leave a Reply