पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कासा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. बिरसा मुंडा जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या उद्देशाने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश
या कार्यक्रमाला महिला जिल्हाध्यक्ष रोहिणी शेलार, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग बेलकर, अशरफ घची, सुनील नलवडे, योगेश बन, स्वाती राऊत, मोखाडा तालुकाध्यक्ष विलास पाटील, विपुल राऊत, जिल्हा खजिनदार जितेंद्र पटेल, रोहित चक्रवर्ती, शर्मिला भानुशाली आणि जव्हार नगरपालिकेचे सभापती इम्रान मेमन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दीपेश रसाळ, महेश बोलकर, धर्मा बोलकर या यूट्यूब कलाकारांसह मधु मेरे यांनी या वेळी पक्षात प्रवेश केला. काही काळ पक्षापासून दूर गेलेल्या नाराज कार्यकर्त्यांनीही पुन्हा पक्षात घरवापसी केली. जिल्हाध्यक्ष ठाकूर यांनी नवागतांचे स्वागत केले.
संघटना मजबूत करण्याचा निर्धार
डहाणू तालुक्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय काम करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. कासा येथे कार्यालय सुरू झाल्याने पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक कामाला बळ मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Leave a Reply