मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रीलच्या नादात स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात

पिंपरी-चिंचवडमध्ये रीलसाठी जीव धोक्यात घालण्याचे प्रकार वाढले आहेत. हातात फटाके पेटवणे, भरधाव दुचाकीवर स्टंटबाजी यामुळे स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात येत आहे.

रीलच्या नादात स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात

पिंपरी, ता. १७ : प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापोटी सोशल मीडियावर रील आणि व्हिडिओ बनवताना काही तरुण स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. हातात फटाक्यांच्या माळा घेऊन त्या पेटवून चित्रीकरण करणे, भररस्त्यात फटाके फोडणे, सुसाट वेगाने दुचाकी चालवत स्टंटबाजी करणे आणि वाहनांवर उभे राहून व्हिडिओ तयार करणे असे प्रकार पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दिसून येत आहेत. काही सेकंदांच्या व्हिडिओसाठी जीव धोक्यात घालण्याचे हे प्रकार चिंतेचा विषय बनले आहेत.

सण-उत्सव आणि वाढदिवसाच्या निमित्ताने फटाक्यांचा वापर केला जातो. काही तरुण फटाक्यांच्या माळा हातात धरून त्या पेटवल्यानंतर त्यांचे व्हिडिओ शूट करतात. मात्र काही वेळा फटाके हातातच फुटण्याचा धोका असतो. त्यामुळे चेहरा, डोळे आणि हातांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. अशा वेळी परिसरातील नागरिकांनाही त्याचा फटका बसू शकतो. मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. दुचाकीवरून भरधाव जाणे, पुढचे चाक उचलणे, एकाच चाकावर वाहन चालवणे, वाहन चालवताना हात सोडणे आणि वाहनावर उभे राहून व्हिडिओ तयार करणे यांना काही तरुणांकडून प्राधान्य दिले जात आहे. सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ असतानाही हे प्रकार केले जातात. मागून मित्र दुसऱ्या वाहनावरून व्हिडिओ शूट करतात. या प्रकारात चालकाचे नियंत्रण सुटल्यास मोठा अपघात होऊ शकतो.

जिवाशी खेळ

सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच प्रकाराची नक्कल करण्याचे प्रमाण वाढते. मित्रांकडून प्रोत्साहन मिळत असल्याने अनेकदा परिणामांचा विचार केला जात नाही. काही सेकंदांच्या प्रसिद्धीपेक्षा स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य अधिक महत्त्वाचे असल्याचे भान तरुणांनी ठेवण्याची गरज आहे.

आठ दिवसांपूर्वी देहूगाव येथे एका तरुणाने पेटता फटका हातात धरून जोरात गोल फिरवला. याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले जात होते. मात्र या फटाक्यांच्या ठिणग्या दूरपर्यंत उडून परिसरातील काही जणांना किरकोळ भाजले. निगडीतील लोकमान्य टिळक चौकाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर काही तरुण दुचाकीवर स्टंटबाजी करीत चित्रीकरण करीत होते.

पोलिसांची कारवाई

सार्वजनिक रस्त्यांवर स्टंटबाजी करणे, भरधाव वाहन चालवणे आणि फटाक्यांचा धोकादायक वापर करणे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधितांची ओळख पटवून पोलिसांनी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे, असे नागरिक सुनील राजेभोसले यांनी सांगितले. रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या प्रकरणात मागील काही दिवसांत गुन्हेही दाखल झालेले आहेत. अशी स्टंटबाजी कुठे दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड) सुदर्शन राठोड यांनी सांगितले.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance