हिवाळा सुरू झाला की थंडीच्या वातावरणात गरमागरम चहासोबत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी वेगवेगळ्या भाज्यांपासून तयार केलेल्या भजी-पकोड्यांना विशेष पसंती दिली जाते. त्यातही फ्लॉवरचे पकोडे हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले हे पकोडे चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात. संध्याकाळच्या चहासोबत किंवा अचानक घरी आलेल्या पाहुण्यांसाठीही हा एक उत्तम स्नॅक ठरू शकतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून हे भजे कमी वेळात तयार करता येतात.
फ्लॉवर भजीसाठी लागणारे साहित्य
ही भजी बनवण्यासाठी २०० ग्रॅम फ्लॉवर, दीड कप बेसन, १ टीस्पून बेकिंग सोडा, २ कप रिफाइंड तेल, २ टीस्पून आमचूर पावडर, २ टीस्पून लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी लागते.
भजी बनवण्याची पद्धत
प्रथम फ्लॉवर नीट धुवून त्याचे छोटे तुकडे करा. एका पॅनमध्ये थोडे मिठाचे पाणी उकळून त्यात हे तुकडे टाका. थोड्या वेळाने ते स्वच्छ पाण्यातून काढून बाजूला ठेवा. पकोड्यांचे पीठ बनवण्यासाठी एका भांड्यात बेसन, मीठ, १ चमचा तेल, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर आणि खाण्याचा सोडा घालून सर्व साहित्य एकत्र करा. यात एकदम पाणी टाकण्याऐवजी हळूहळू पाणी घाला. पिठात गुठळ्या होणार नाहीत म्हणून ढवळत राहा. हवे असल्यास पिठात थोडासा ओवा घालू शकता. जास्त पाणी घालू नका; पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे.
आता एक पॅन मध्यम आचेवर गरम करा आणि त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर फ्लॉवरचा प्रत्येक तुकडा तयार केलेल्या बेसनाच्या पिठात बुडवून पॅनमध्ये ठेवा आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळा. एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवून त्यावर पकोडे काढा. हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरम चहाबरोबर ही कुरकुरीत फ्लॉवर भजी सर्व्ह करा.
Leave a Reply