नंदुरबार जिल्ह्यातील धानोरा येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव सेवा सप्ताहाअंतर्गत विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिरात आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उपस्थित ग्रामस्थांचे अर्जही भरून घेण्यात आले.
कोणती कागदपत्रे मिळाली
उपस्थित ग्रामस्थांना आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, रहिवास आणि अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच दिव्यांग प्रमाणपत्र अशी विविध कागदपत्रे पूर्ण करून वितरित करण्यात आली. शिबिराला तहसीलदार संतोष डेरे, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, नायब तहसीलदार प्रांजल पाटील, धानोरा येथील राजकीय पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
रेशन कार्डधारकांना दिलासा
याप्रसंगी डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, पिवळ्या आणि केसरी कार्डधारकांना पूर्वी शासकीय स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत होते. मात्र विभाजन केल्यामुळे त्यांच्यापैकी पांढरे कार्डधारकांना धान्य मिळणे बंद झाले. त्यांनी त्यांचे जुने आणि नवीन रेशन कार्ड सादर केले तर त्या कार्डधारकांना पुन्हा धान्य मिळणे सुरू होईल. ग्रामीण जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन
डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. सध्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रीम मदत दिली जात असून, पात्र शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने ती प्रक्रिया करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, शिबिरात शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देण्यात आली आणि विविध विभागांकडून योजनांच्या लाभाची प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.
Leave a Reply