प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याची बुद्धिमत्ता वाढावी आणि त्याने नेहमी आनंदी राहावे, असे वाटते. मुलांच्या मेंदूच्या विकासात त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा आणि पालकांच्या वागणुकीचा महत्त्वाचा वाटा असतो. अनेकदा नकळत पालकांकडून अशा काही चुका होतात, ज्याचा मुलांच्या मनावर आणि वागण्यावर परिणाम होऊ शकतो.
उदाहरणार्थ, मूल सकाळी रडत उठल्यास त्याला रागावण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगणे अधिक योग्य ठरते. दिवसाची सुरुवात ज्या वातावरणात होते, त्याचा परिणाम मुलांच्या मूडवर आणि दिवसभराच्या वागण्यावर होऊ शकतो. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी सकाळची पहिली दहा मिनिटे महत्त्वाची मानली जातात.
सकाळची पहिली दहा मिनिटे का महत्त्वाची
दिवसाची सुरुवात प्रेमळ शब्दांनी करावी. मुलाला उठवताना ‘गुड मॉर्निंग सनशाइन’, ‘आजचा दिवस तुझ्यासाठी खास असणार आहे’ किंवा ‘तू खूप हुशार आणि मनाने चांगला आहेस’ असे सकारात्मक शब्द बोलावेत. त्यानंतर मुलाला प्रेमाने मिठी मारावी आणि किस करावे. पालकांचा हा प्रेमळ स्पर्श मुलाला सुरक्षिततेची आणि आपलेपणाची भावना देतो. त्यामुळे त्याचा मूड चांगला राहण्यास आणि दिवसाची सुरुवात आनंदाने करण्यास मदत होते.
पालकांनी कराव्यात या तीन गोष्टी
प्रेमळ स्पर्शाने सुरुवात करा: सकाळी उठल्यावर मुलाला प्रेमाने मिठी मारा आणि किस करा. सकारात्मक शब्द आणि प्रेमळ स्पर्श यामुळे मूल दिवसाची सुरुवात आनंदाने करते.
जग साहस आणि उत्साहाने भरलेले आहे, हे सांगा: आजचा दिवस काहीतरी नवे शिकण्याची आणि अनुभवण्याची संधी आहे, असे मुलाला सांगा. हे जग अनेक सुंदर गोष्टी आणि मजेदार अनुभवांनी भरलेले आहे, याची त्याला जाणीव करून द्या. आजचा दिवस मजेदार बनवण्यासाठी त्याला काय करायला आवडेल, असे विचारा. मित्रांसोबत खेळणे, शाळेत काहीतरी नवे शिकणे किंवा आवडीचा नाश्ता करणे अशा गोष्टींबद्दल त्याच्याशी बोला. यामुळे मुलाला स्वतःच्या आवडीनिवडी व्यक्त करण्याची संधी मिळते आणि दिवसाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागते.
मुलाचे महत्त्व आणि चांगले गुण सांगा: सकाळी उठल्यावर मूल तुमच्यासाठी किती खास आहे, हे आवर्जून सांगा. त्याच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करा आणि त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे, हे व्यक्त करा. ‘तू खूप छान प्रयत्न करतोस’, ‘तू नव्या गोष्टी नक्की शिकू शकतोस’ किंवा ‘मला तुझा अभिमान वाटतो’ असे शब्द मुलाला प्रोत्साहन देतात. पालकांचे प्रेम आणि विश्वास यामुळे मुलाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तसेच, नवे काही शिकताना किंवा अडचणींचा सामना करताना तो अधिक धैर्याने प्रयत्न करू शकतो.
Leave a Reply