कॉर्पोरेट विश्व म्हटले की कामाची उद्दिष्टे, स्पर्धा, व्यवस्थापन आणि कामकाजातील शिस्त या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. मात्र, या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असलेली माणसे, त्यांच्यातील नातेसंबंध, संवाद आणि परस्पर सामंजस्य यांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. याच मानवी पैलूंवर मनोरंजक पद्धतीने भाष्य करणारे ‘कॉर्पोरेट लग्नाची गोष्ट – The Corporate Wedding Story’ हे अनोखे मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या नाट्यउपक्रमाची निर्मिती मोमेंटम एचआर टॅलेंट डेव्हलपमेंटने केली असून, टचवूडतर्फे तो सादर करण्यात येणार आहे. गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नाशिकच्या कालिदास कलामंदिरात या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. सुमारे १०० मिनिटांच्या या नाटकाचे लेखन हेमंत बेळे यांनी केले असून, प्रवीण काळोखे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
नाटकात मांडलेले विषय
विनोद, रंजक प्रसंग आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट विश्वातील नात्यांचे वास्तव नाटकात मांडण्यात आले आहे. संवादातील अडथळे, विचारांमधील भिन्नता, बदलांशी जुळवून घेण्याची वृत्ती, परस्पर आदर आणि सांघिक भावना अशा महत्त्वाच्या विषयांना नाटकातून स्पर्श करण्यात आला आहे. नाटकाच्या माध्यमातून कॉर्पोरेट संस्कृतीतील विविध पैलू उलगडण्याचा हा अभिनव प्रयत्न मानला जात आहे.
प्रत्येक प्रयोगानंतर चर्चासत्र
हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, विविध कॉर्पोरेट संस्थांमधील कर्मचारी, व्यवस्थापक आणि व्यावसायिकांना एकत्र आणून कार्यसंस्कृतीविषयी सकारात्मक संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक प्रयोगानंतर छोटेखानी चर्चासत्र आयोजित करून नाटकातील प्रसंग आणि अनुभव यांची प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील परिस्थितीशी सांगड घालण्याची संकल्पनाही मांडण्यात आली आहे.
या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यासाठी विविध कॉर्पोरेट संस्थांनी सहभागी व्हावे आणि २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या प्रयोगाला उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मोमेंटमचे गजेंद्र मेढी यांनी केले आहे.
Leave a Reply